Amalner News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amlaner) तालुक्याला साहित्य संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Marathi Sahitya Sammelan) महामंडळातर्फे स्थळ निवड समितीने अमळनेरची निवड केली आहे. यापूर्वी अमळनेर येथे 1952 मध्ये संमेलन भरले होते. त्यानंतर आता तब्बल 71 वर्षांनतर पुन्हा अमळनेरला संमेलन घेण्याची संधी मिळाली आहे.


97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळाच्या स्थळ निवड समितीतर्फे 23 रोजी सर्वानुमते मराठी वाड्य मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि साने गुरुजीच्या कर्मभूमीत संमेलन घेण्यास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मान्यता दिली. दरम्यान, पुण्यात (Pune) झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत अमळनेरचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. या संमेलनासाठी खान्देशातील अमळनेर, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (सांगली), तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातूनही प्रस्ताव होता. दोन दिवसांपूर्वीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे, महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनीताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांच्या समितीने औदुंबर, अमळनेर आणि सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले. 


दरम्यान या तिन्ही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन स्थळ निवड समितीने सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर या संस्थेची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अमळनेरला होणार हे निश्चित झाले आहे. साने गुरुजीच्या कर्मभूमीत, संत सखाराम महाराजांच्या पुण्यभूमीत आणि श्रीमंत प्रताप शेठजी व अझीम प्रेमजी यांच्या उद्योगभूमीत 27 मे साहित्य संमेलन होणार आहे. ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. समेलन यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी सगळ्या अमळनेरकरांनी घेतली. ही आनंदाची बाब आहे. तिन्ही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड समितीने सर्वानुमते अमळनेरची शिफारस केल्यानंतर महामंडळाने त्याला मान्यता दिली.


71 वर्षांनी अमळनेरमध्ये संमेलन


जळगाव जिल्ह्यात 1936 मध्ये मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्या वेळी माधव त्रिंबक पटवर्धन संमेलनाचे अध्यक्ष होते. 1952 मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. त्यानंतर आता अमळनेर शहरात दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे. यापूर्वी जळगाव शहरात 1984 मध्येही संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षस्थान शंकर रामचंद्र खरात यांनी भूषविले होते. जळगाव जिल्ह्याला 40 वर्षांनी पुन्हा साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. यापूर्वी अमळनेर येथे 1952 मध्ये संमेलन भरले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी होते. त्यामुळे तब्बल 71 वर्षांनतर पुन्हा अमळनेरला संमेलन घेण्याची संधी मिळाली आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून तेथून प्रस्ताव येत होता. नियोजन क्षमता पाहून त्यांची निवड करण्यात आली.