Shirdi Saibaba : काही दिवसांपूर्वी बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्रींनी (Bageshwer Dham) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद संपतो ना संपतो तोच आता साईबाबा संस्थानबाबत पोस्ट व्हायरल करत नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं समोर आलं आहे. साईबाबा संस्थानने हज यात्रेसाठी 35 कोटी रुपये दिले, मात्र राममंदिरासाठी (Ram Mandir) पैसे दिले नाही, अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाली आहे. मात्र अशाप्रकारे कुठलाही निधी देण्याची तरतूद नसून साईबाबा संस्थानने (Shirdi Sai Baba) या बातमीचे खंडन केले आहे.


लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साई मंदिरात (Shirdi Sai baba) रोजच लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शिर्डी साई मंदिर परिसरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. अनेकदा शिर्डी साईबाबाच्या नावाने सोशल मीडियावर फेक मेसेज व्हायरल होतात. त्यामुळे अनेक गैरसमज पसरल्याचे या आधीही घडले आहे. आता एक नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तो असा कि, 'गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात 'साईबाबा संस्थान हज यात्रेसाठी 35 कोटी निधी दिला. मात्र राममंदिरासाठी नाही अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र शिर्डी साई संस्थानने या पोस्टचे खंडन केले आहे. 


शिर्डी साईबाबा संस्थानच्या म्हणण्यानुसार, "असा कुठलाही निधी दिला नसून निधी देण्याची तरतूदच नसल्याचे साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले आहे. साईमंदिराला बदनाम करणयाचं हे कारस्थान असून संबंधित समाज माध्यम आणि अपप्रचार करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. तर शिर्डी ग्रामस्थही आता अशा अपप्रचारामुळे आक्रमक झाले असून आजवर आम्ही संयम ठेवला, मात्र जर असंच सुरु राहिलं तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा सुजित गोंदकर यांनी दिला आहे. दरम्यान आजही हजारो लाखो लोक शिर्डी साईबाबा दर्शनासाठी देशभरातून शिर्डीत दाखल होतात. त्यामुळे रोजच साई संस्थानच्या परिसरात भाविकांची गर्दी असते. साईबाबा म्हणजे आजही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, साईबाबांनी सर्वधर्म समभावाची शिकवण देत सबका मालिक एक हा महामंत्र जगाला दिला. मात्र गेल्या काही दिवसांपासून साईबाबांची अनेक प्रश्नावरुन वाद उपस्थित करण्यात येत असून साईबाबा संस्थानला लक्ष्य केले जात असल्याचे साई संस्थानचे म्हणणे आहे. 


हार फुलांवरील बंदी उठणार 


साईबाबा मंदिर आवारातील हार फुलांवरील बंदी उठणार असल्याची माहिती आहे. बंदी उठल्यानंतर परिसरातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिर्डीतील शेकडो व्यावसायिक आणि परिसरात 384 हेक्टर क्षेत्रावर फुलशेती केली जाते. या सर्व शेतकऱ्यांना हार फुले बंदीचा फटका सहन करावा लागत होता. मात्र आता साई संस्थान मार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करुन मंदिराच्या प्रांगणात साईभक्तांना फुले उपलब्ध करुन दिली जाणार आहे.