Marathi Sahitya Sammelan : 97 वे साहित्य संमेलनाच्या ठिकाणावर शिक्कामोर्तब झालं असून जळगावच्या अमळनेरमध्ये हे साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्ध्यात झालेल्या साहित्य संमेलनानंतर आता 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार यासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज पुण्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सातारा, सांगलीतील औदुंबर, जळगावमधील अमळनेर आणि जालना या चार स्थळांची नावे चर्चेत होती. यातून जळगावची निवड करण्यात आली आणि या बैठकीत जळगावमधील अमळनेरमध्ये संमेलन भरवण्यावर शिक्कामोर्तब झाला.


साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार, साने गुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजेच जळगावच्या अमळनेरमध्ये पुन्हा साहित्य रसिकांचा मेळा भरणार आहे. 97 वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणार आहे. 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळनिवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्री. प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे होते.


स्थळनिवड समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड समितीने सर्वानुमते मराठी वाङमय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली. अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा साहित्य संमेलन होत आहे.


पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत, महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उपा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समिती सदस्यांव्यतिरिक्त श्री. प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर. अ. के. आकरे व प्रकाश गर्ने हे सदस्य उपस्थित होते.


अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा मराठी साहित्य संमेलन


पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 मध्ये पुणे शहरात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे होते. जळगाव जिल्ह्यात 1936 मध्ये मराठी साहित्य संमेलन झाले होते. माधव त्रिंबक पटवर्धन त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. 1952 मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. त्यानंतर आता अमळनेर शहरात दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे. यापूर्वी, जळगाव शहरात 1984 मध्येही संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षस्थान शंकर रामचंद्र खरात यांनी भूषविले होते.


महत्त्वाच्या बातम्या: