Nashik Majha Impact : नाशिकच्या (Nashik) इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) महावितरणचा (Mahavitaran) कर्मचारी विद्युत खांबावर चढलेला असताना शॉक लागून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत होते. याबाबतची बातमी माझाने दाखवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या बातमीची दखल घेत अमोल जागले यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी भेट घेतली. 


दरम्यान काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथील महावितरण महावितरणचा कंत्राटी कामगार म्हणून असलेला अमोल जागले याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुराच्या पाण्यात पोहत जात जागले याने परिसरातला वीज पुरवठा सुरळीत केला होता. त्यानंतर कार्यरत असताना दोन दिवसांपूर्वी वीस दुरुस्ती करत असताना विजेच्या खांबावर असताना जागले यास विजेचा धक्का बसल्याने तो खाली कोसळला. यामध्ये अमोल जागले हा गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मित्रांच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान एबीपी माझाने अमोल जागले (Amol Jagle) यांची परिस्थिती दाखवली ही बातमी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आज दुपारी नाशिकमध्ये दाखल जागले याची भेट घेतली. तसेच संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत अमोल जागले याच्या उपचारासाठी तातडीने दोन लाख रुपयांची मदत केली असून पुढील उपचारासाठी सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याची माहिती चिवटे यांनी यावेळी दिली. 


दोन दिवसांपूर्वी घडली घटना
अमोल जागले हे दोन दिवसांपूर्वी कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का बसल्याने विद्युत खांबावरून तो खाली कोसळला होता. या घटनेत त्याचा पाय निकामी झाला असून पोट आणि कंबरेलाही गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे जागले हे नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान उपचाराचा खर्च अवाजवी असल्याने मित्रांच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. 


मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन खर्च 
एबीपी माझाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी स्वतः जागले यांची भेट घेतली. यावेळी उपचारासाठी डॉ.श्रीकांत शिंदे फ़ाउंडेशन कड़ून दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमोलचा डावा पाय निकामी झाल्याने तो डावा पाय देखील डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून बसविला जाणार असल्याची माहिती चिवटे यांनी दिली. यावेळी अमोल यांच्या कुटुंबीयांनी आभार मानले. 


कंत्राटी कामगारांबाबत लवकरच निर्णय 
महावितरण मंडळात अनेक कंत्राटी कामगार कार्यरत असून अशा पद्धतीने घटना घडल्यानंतर महावितरण व्यवस्थापन हात वर करते. अमोल जागले सारखे हजरो युवक जीवाची बाजी लावून काम करतात. मात्र अशी घटना घडल्यानंतर महावितरण आधार देत नसल्याचे जागले यांच्या प्रकरणातून पुढे आले आहे. त्यामुळे हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहचवणार असून यावर ठोस उपाययोजना केली जाईल असे आश्वासन यावेळी उपस्थित मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिले.