Nashik Rain Update : गेल्या चार ते पाच दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने आज सायंकाळी झोडपून काढले. तासाभरात जवळपास 27 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक सह जिल्हाभरात पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मात्र आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहरासह मुंबई नाका, सीबीएस, पाथर्डी फाटा, गंगापूर नाका, गंगापूर रोड परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुढील एका तासातच शहरात तब्बल 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 


दरम्यान एका तासांत पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले, अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने चालकांना वाहणे चालविणे कठीण झाले होते. तर शहर परिसरात म्हणजे नाशिकरोड, गिरणारे परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. नाशिकसह राज्यातील काही भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार आज सायंकाळी नाशिक शहरात मुसळधार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 


अनेक भागात ट्राफिक जॅम
दरम्यान पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. यामुळे मायको सर्कल, कृषिनगर जॉगिंग ट्रक परिसरात ट्रॅफिक जॅम झाल्याचे पाहायला मिळाले. गंगापूर रोड, जेहान सर्कल, कृषिनगर रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने चालविणे कठीण झाले होते.


गिरणारे, दुगाव परिसरात तुरळक
तर नाशिक शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र फ्रावशी अकॅडमी ते गिरणारे परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली.


पुढील पाच दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज
आजपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाच ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. फक्त मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरच अतिमुसळधारेचा अंदाज आहे. इतरत्र सर्वत्र चांगला पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्याचा अंदाज आहे.