Nashik News : सध्या महावितरणच्या (Mahavitaran) कामामुळे अनेक नागरिक नाराज असून अशातच वीज कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमी आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील काळुस्ते येथील वीज कर्मचाऱ्याने भर पुरात उडी घेत सहा-सात गावाचा वीजपुरवठा सुरळीत केला होता. त्यानंतर नाशिकच्या (Nashik) सिन्नर (sinnar) तालुक्यात काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्याने 20 फूट खोल तलावात पोहत जाऊन वीज पुरवठा सुरळीत केला आहे. 


योगेश वाघ असे या पठ्ठयाचे नाव असून या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सिन्नर तालुक्यातील वीज कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे सहा तास बंद असलेला वीज पुरवठा सुरळीत झाला होता. सिन्नर तालुक्यातील वावी आणि पाथरे या गावांना वीज पुरवठा करणाऱ्या उपकेंद्राचा शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून काही कारणास्तव वीज पुरवठा बंद झाला. हा बिघाड शोधण्यासाठी दोन्ही उपकेंद्राची कक्ष अभियंता अजय सावळे आणि हर्षल मांडगे हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन सिन्नर ते वावीदरम्यान असलेला मुख्य वीज वाहिनीची पाहणी करत होते. काही कर्मचारी सिन्नरच्या बाजूने तर काही कर्मचारी वावीच्या बाजूने दापूर पर्यंत पेट्रोलिंग करत येत असताना गोंदे शिवारात असलेल्या गोंद नाल्यावर पाझर तलाव क्षेत्रात असलेल्या खांबावर बिघाड असल्याचे लक्षात आले.  चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या खांबापर्यंत पोहोचायचे कसे हा प्रश्न होता? 


दरम्यान समृद्धी महामार्गासाठी या तलावातील मातीचा उपसा केल्याने तलाव वीस फूट खोल गेला आहे. तलावातील काठ ते पोलापर्यंतचे अंतर 70 फूट, खांबापर्यंत पोहोचण्यासाठी सीडीही नाही अशा बिकट परिस्थितीत मूळचा मीठसागरे येथील रहिवासी आणि वावी, पाथरे उपकेंद्रात कार्यरत असलेला कर्मचारी योगेश बापू वाघ पुढे आला. आपणास पोहता येत असल्याने पाण्यातून खांबापर्यंत जातो असे सांगत अधिकाऱ्यांची परवानगी घेत त्यांनी पाण्यात उडी मारली. विज वितरणच्या अधिकाऱ्यांनी परवानगी घेत वाघ यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली. 70 फुटांची अंतर पार खांबावर सराईतपणे चढले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी दोन वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान वाघ यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे


अशी सोडवली समस्या 
सिन्नर ते वावी येणारी 33 केव्ही वाहिनीवर दरम्यान बिघाड झाल्याचे महावितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. मात्र नेमका कोणत्या ठिकाणी हा बिघाड झाला हे लक्षात येत नव्हते. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी शोध मोहीम सुरु केली. पेट्रोल्लिंग करत असतानाच गोंदे शिवारात बंधाऱ्यामध्ये असलेल्या 3 पोलपैकी मध्यभागी असलेल्या एका पोलवरती वायर जंप तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर 11.30 च्या सुमारास फॉल्ट सापडला. दरम्यान विद्युत पोल असलेल्या बंधाऱ्यात खूप खोल पाणी असल्याने सहज जाणे शक्य नव्हते. पोहून जाणे हाच एक पर्याय होता.त्यानंतर श्री योगेश वाघ ह्या कर्मचाऱ्याने मोठी हिम्मत दाखवत पाण्यात पोहत पोल वरती चढले आणि  सुरक्षा साधने सहित कामाला 12.30 वाजता सुरवात केली. 2 वाजता काम पूर्ण झाल्यानंतर 2.20 मिनिटे ला वाहिनीचा वीजपुरवठा सुरळीत झाला.