Nashik Rain Update : तीन दिवसांच्या उपडझापनंतर आज सकाळपासून पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे कमबॅक झाले असून आज सकाळपासून रिपरिप सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिलत असून यंदा काहीअंशी दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तर दुसरीकडे नाशिककरांच्या पाणी कपातीचे संकटही टळले आहे.
राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईपासून ते राज्यातील सर्वच भागात पाऊस जोरदार कोसळत असून अनेक भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नाशिक (Nashik Rain) शहरासह जिल्ह्यातही मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांसह नागरिक प्रतीक्षेत होते, अखेर लांबणीवर पडलेल्या पावसाने जोरदार आगमन केले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनने जोरदार आगमन करत सर्वाना ओलेचिंब केले. त्याचबरोबर अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या होतंय, त्या पेरण्यांना देखील वेग येऊन आता अनेक भागातील पेरण्यां संपुष्ठात आल्या आहेत.
तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊसाची बरसात सुरूच असून मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात पावसाने (Nashik Rain Update) उघडीप दिल्याने काहीकाळ नागरिकांना उसंत मिळाली. मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा रिपरिप सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान कालच्या जिल्हाभरातील पावसाची आकडेवारी बघता बागलाण (Baglan) तालुका सोडला तर इतर तालुक्यात अगदी तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. मात्र आज सकाळापासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली असून भात पिकाला साजेसे वातावरण मिळत असल्याने लवकरच भात लावणीला सुरवात होईल असे चित्र आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून इतर पिकांची लागवड देखील सुरु असल्याचे चित्र आहे.
कोकणासह मुंबईत पाऊस
मुंबईसह (Mumbai) उपनगरात पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक दोन ते पाच मिनिटं उशिराने सुरु आहे. दक्षिण मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दोन्ही बाजूकडील म्हणजे पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, तर मुंबईसह परिसरात अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.