Nashik Saroj Ahire : शरद पवारांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या. विशेष म्हणजे, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीला देखील हजर होत्या. मात्र अद्यापही त्यांचा निर्णय तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत असलेल्या सरोज अहिरे या नाशिकला परतल्या आहेत. आज कुठल्याच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करत तब्येत बरी नसल्यानं नाशिकला आल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यभरात नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरू असून त्याचा पहिला अंक नाशिकमध्ये (Nashik) पाहायला मिळाला. नाशिकच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले असून काल भुजबळ समर्थकांनी (Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी कार्यालय ताब्यात घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी शरद पवार समर्थक कार्यालयाच्या बाहेर असल्याने त्यांची बैठक होऊ शकली नाही. परिणामी दोन्ही गटात काही काळ चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अगदी जवळच्या असलेल्या अहिरे नेमक्या कुणाच्या बाजूने हा प्रश्न अनुत्तरित आहे.
दरम्यान, सरोज अहिरे संदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे की, अहिरे या दोन दिवसांपासून मुंबईत होत्या. रात्री उशिरा त्या मुबंईहुन नाशिकमध्ये परतल्या असून आज कुठल्याच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तब्येत बरी नसल्यानं नाशिकला आल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली असून आज रुग्णालयात दाखल होणार आहे. आजारपणामुळे सध्या मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती देत सायंकाळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळेंची घेतली भेट
नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या (Deolali Assembaly) राष्ट्रवादी आमदार सरोज आहिरे या पुन्हा शरद पवारांसोबत जाणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून काल सुप्रिया सुळेंसोबत त्यांची भेट झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून सरोज आहिरे या ओळखल्या जातात. अनेक जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार हे माझ्या वडीलांसमान असल्याचंही त्यांनी वक्तव्य केल आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांसह इतर मंत्र्यांच्या शपथविधीला त्या उपस्थित असल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.
दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर त्या नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्यावेळी समर्थकांचेही फोन उचलत नसल्याने समर्थकांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम सध्या निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र रात्री उशिरा त्या नाशिकला पोहचल्या असून आज त्या भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते.