Nashik Crime : नवीन वर्षातही लाचखोरीचा (Bribe) सिलसिला सुरुच असून नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यांत हे प्रमाण वाढत आहे. शिपायांपासून क्लास वन अधिकाऱ्यांपर्यंत लाचखोरीचे लोण पसरले आहे. अशातच निफाड तालुक्यातील नैताळे गावात लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. 


सध्या महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात जत्रा यात्रांना उधाण आले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर यात्रा होत असल्याने अनेक बारीकसारीक व्यावसायिक यात्रेत दुकान लावण्यासाठी धडपड करत असतात. शिवाय यात्रा आणि पाळणे हे जणू समीकरण आहे. हेच पाळणे लावण्यासाठी स्थानिक ग्रामसेवकाने लाच मागितल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील निफाड (Niphad) तालुक्यातील नैताळे येथील मतोबा यात्रोत्सव समारोपाच्या पूर्वसंध्येलाच ग्रामसेवकास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 


31 हजार रुपयांची मागणी, सात हजारांवर तडजोड, मात्र लाच स्वीकारताना अटक


एसीबीकडे दाखल तक्रारीवरुन स्थानिक गावचा ग्रामसेवक संशयित राजेंद्र मुरलीधर दहिफळे, खासगी व्यक्ती जगन्नाथ मगन पाठक आणि सागर भारत आहेर यांनी पाळणा लावण्यासाठी 31 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती सात हजार रुपयांची लाच घेताना तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान दुकान लावून देण्याच्या बदल्यात पैसे मागितल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यात्रोत्सवाला खुद्द शासकीय अधिकारीच कशाप्रकारे गालबोट लावत असल्याने स्थानिक पुढाऱ्यांसमोर मान खाली घालण्याची नामुष्की ओढवली आहे.


दरम्यान, संबंधित कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे, पोलीस नाईक हेंबाडे, पोलीस शिपाई नेटारे आणि गांगुर्डे यांनी केली.


एसीबीकडून आवाहन 


लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून या गुन्ह्याविरुद्ध विभाग कारवाई करत असतो. शासकीय लोकसेवक त्याचे काम कायदेशीरपणे प्रामाणिकरित्या करत असेल आणि ते काम बेकायदेशीररित्या करुन घेण्यासाठी कोणी त्याला लाच देण्याचा प्रयत्न करत असेल, तेव्हा तो पण एक अपराधच आहे. ज्याप्रकारे लाच घेण्यासंदर्भात किंवा मागण्यासंदर्भात एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल होतो त्याचप्रकारे लाच देण्यासंदर्भात एखाद्या व्यक्तीविरुद्ध लाभ देण्याचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कायदेशीर कामकाज करुन देण्यासाठी कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही लाचेची मागणी करत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे अथवा तक्रार नोंदवावी अशी आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांना वारंवार करण्यात येते.