Nashik Civil Hospital : राज्यभरात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयातील (Nashik Civil Hospital) रुग्ण आणि नातेवाईकांचे प्रचंड हाल सध्या सुरू आहेत. केस पेपर काढण्यासाठी सुद्धा दोन ते तीन तासांची रांग लागली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची झळ सर्वसामान्यांसह गरीब रुग्णांना बसते आहे.
सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसह राज्यातले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपामध्ये (Staff Strike) सहभागी झालेत. त्यामुळे राज्यात सध्या सर्वत्र गोंधळाची परिस्थिती आहे. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सरकारी कामांना तर मोठी झळ बसली आहे. मात्र सरकारी रुग्णालयामधली कामही थंडावली आहेत. कारण संपामध्ये नर्सेस, वॉर्डबॉय (Wardboy) आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील साधी कामे असलेली केस पेपर काढणे, रुग्णांची प्राथमिक तपासणी करणे ही कामेही खोळंबली आहेत. परिणामी रुग्णसेवेच्या कामालाच ब्रेक लागला आहे. दरम्यान या संपाची मोठी झळ विद्यार्थ्यांना रुग्णांना आणि सामान्य नागरिकांना बसली आहे.
संपाची झळ सर्वसामान्यांसह गरीब रुग्णांना
राज्यभरात सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईकांचे प्रचंड हाल सध्या सुरु आहेत. केस पेपर काढण्यासाठी सुद्धा दोन ते तीन तासांची रांग लागली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची झळ सर्वसामान्यांसह गरीब रुग्णांना बसते आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरकडे जाण्याअगोदर केस पेपर काढणे आवश्यक असते. मात्र हाच केस पेपर काढण्यासाठी सध्या दोन तीन तास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. त्यामुळे केस पेपर काढायचा कधी? डॉक्टरांना भेटायचं कधी? उपचार कधी करायचे? असे प्रश्न रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांपुढे पडत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे आज राज्यभरातील कर्मचारी वर्गाने संप घोषित केला आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात अनेक लोक तपासणीसाठी बाहेर जाऊन आलेले आहेत. सकाळी सात ते आठ वाजेपासून रुग्णालयाबाहेर बसून आहेत. मात्र इथे कुठलीही पूर्व सूचना न देता रुग्णांना बसून ठेवण्यात आल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. यामुळे आम्हाला मनस्ताप झाला असून आज ओपीडी बंद असून केस पेपर काढला जाणार नाही, अशा सूचना देणं गरजेचं होतं, अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान या संपामुळे दहावी बारावीच्या परीक्षांचा निकालही उशिरा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहावी बारावीचे उत्तर पत्रिका तपासणार नसल्याची भूमिका राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने घेतले आहे. मात्र परीक्षा सुरळीत होतील, ही स्पष्ट केले आहे.
काळ्या फिती लावून कामकाज
दरम्यन आजपासून राज्यभरात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे महसूल, आरोग्य, भूमी अभिलेख, कृषी आदी कार्यालतील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून देखील असंख्य कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून कामकाज सुरु ठेवले आहे. नागरिकांच्या सोयी सुविधांवर संपाचा परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत असल्याचे उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी सांगितले.