Nashik Leopard News : नाशिक (Nashik) शहर परिसरात बिबट्याच्या दर्शनासह हल्ले सुरूच असून दोन हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच आता मांजरीच्या मागावर असलेला बिबट्या (Leopard) थेट घराच्या छतातून खाली कोसळला. या धावपळीत घरच्यांना बिबट्याची चाहूल लागल्याने ते आधीच पसार झाल्याने पुढील अनर्थ टळल्याची घटना समोर आली आहे.
नाशिकच्या लहवीत गावात रात्रीच्या सव्वा दोनच्या सुमारास हि घटना घडली असून मध्यरात्री गेलेल्या वनविभागाने (Nashik Forest) पहाटेपर्यंत तळ ठोकून बिबट्याचा मागोवा घेतला. मात्र संबंधित घरातून बिबट्याने तेव्हाच काढता पाय घेतल्याचे आरएफओ विवेक भदाणे यांनी सांगितले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या म्हसरूळ (Mhasrul) परिसरात बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात थाळकर नामक युवक जखमी झाला होता. यानंतर लागलीच काल पंचवटी परिसरातील (Panchavti Taluka) तवली फाटा नजीक एकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.
दरम्यान नाशिकच्या वन हद्दीतील लहवीत (Lahvit) येथील शुभम बाळू गायकवाड यांच्या घरातील कुटुंबीय झोपले असताना रात्रीच्या सुमारास अचानक त्यांना मांजरीचा व गुरगुरण्याचा आवाज आला. यावेळी सावजाच्या मागे धावत आलेला बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ सर्वाना उठवून एका खोलीत बसले. यावेळी मांजरीच्या मागे धावत असताना बिबट्या थेट घराच्या छतावर गेला. यावेळी बिबट्याने मांजरीमागे पळत असताना उडी मारली असता सीमेंट पत्रा तुटुन बिबट्या घरात पडला. बिबट्या पुढील दरवाज्याजवळ लपुन बसला. त्यानंतर घरातील लोकांनी प्रसंगावधान राखत मागची खिड़की तोडुन बाहेर पड़ले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मध्यरात्रीच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत वनविभागाने बिबट्याचा शोध घेतला. मात्र बिबट्या आढळून आला नाही.
दिवसातून चारदा दर्शन
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह शहर परिसरात बिबट्याच्या (Leopard Attack) हल्ल्याच्या तसेच दर्शनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नाशिक शहराजवळील विशेष म्हणजे नाशिक शहर परिसरात दिवसाला चारदा बिबट्याचे (Leopard) दर्शन होत असल्याने नाशिक हे बिबट्याचे माहेरघरच बनले आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील मोराडे वस्तीवरील थाळकर कुटुंबातील तरुणावर बिबट्याच्या हल्ल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंचवटी परिसरात बोरगडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तावलीफाट्यानजीक बिबट्याने एका 46 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर लहवीतला घडलेली घटना, त्यामुळे शहर परिसरात हरेक दिवशी बिबट्या आणि नाशिककर आमनेसामने येत असल्याने नाशिक हे बिबट्याचा अधिवासाचा जणू केंद्रच बनले आहे.
काही दिवसांपूर्वी लहवीतला...
नाशिकपासून काही अंतरावर असणाऱ्या लहवित येथे काळे मळ्यात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला होता. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक विजयसिंह पाटील आणि वनमजुर अंबादास जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थितीची पाहणी करीत माहिती घेत मयत बिबट्याचा बछड्याचा मृतदेह ताब्यात घेतला होता. आणि त्यानंतर या मयत बिबट्याच्या बछड्यावर गंगापूर येथील शासकीय रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले होता. त्यामुळे लहवीत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे या घटनांवरून दिसून येते.
बिबट्याचे माहेरघर
बिबट्या आणि नाशिक हे जणू समीकरणच झाले आहे. दर आड दिसाला नाशिक शहर परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला, किंवा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. दरम्यान काल सकाळच्या सुमारास बिबट्याचा हल्ल्याची घटना बोरगड परिसरात घडली आहे. या घटनेत संबंधित जाधव यांनी बिबट्याला दगड मारल्याने बिबट्याने हल्ला केल्याची आरएफओ विवेक भदाणे यांनी दिली आहे. त्यामुळे शहर परिसरात वाढत असलेला मानव बिबट संघर्षात नागरिकांनी देखील सजग असणे आवश्यक आहे. त्यामुळे वनविभागाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.