Nashik Samrudhhi Highway : नाशिकच्या (Nashik) सिन्नर परिसरात (Sinnar Area) सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने 50 एकरावरील शेतीच नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले असून 'सायेब, तुमच्या समृद्धीमूळ आमच्या समृद्धीचं नुकसान', झाल्याचा सवाल त्यांनी नव्या सरकारला केला आहे. तसेच या समस्येचा आठ दिवसात निकाल लावण्यात यावा अन्यथा उपोषणाचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून नाशिकच्या सिन्नर परिसरात समृद्धीचे (Samrudhhi Highway) कामकाज सुरु आहे. या परिसरातील अनेक गावातून समृद्धीच्या महामार्ग गेला आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनींना मोबदला देऊन संपादित केल्या आहेत. दरम्यान आता समृद्धीचे कामही प्रगतीपथावर आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या कामाच्या पाणी हे स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांच्या थेट शेतात घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सिन्नर परिसरातील दुसंगवाडी नजीक शेतकऱ्यांची पिके खराब झाली असल्याने हंगामाच वाया गेल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय शेतात घुसलेल्या पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाचे सध्या राज्यभरातील काही भागात सुरु आहे. समृद्धी महामार्ग सिन्नरमधून गेला असून सुरवातीपासून महामार्गासंदर्भांत अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. सध्या या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून समृद्धी महामार्गाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. महामार्ग बनविताना अनेक नैसर्गिक प्रवाह अडलं गेले आहेत. त्यामुळे पाऊस सुरु झाल्यानंतर नैसर्गिक प्रवाह अडवले गेले आहेत. त्यामुळे हे पाणी थेट त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. पाण्याला मार्ग नसल्याने अडलेलं पाणी शेतात शिरले आहे. यामुळे शेतातील मका, सोयाबीन, ऊस, गुरांचा चारा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणची पिकं सडली, तर काही ठिकाणी पाण्यामुळे पेरणीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राची समृद्धी की शेतकऱ्यांची बरबादी?
दरम्यान तत्कालीन नगरविकास मंत्री असलेले आणि आताचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून यात देवेंद्र फडणवीस यांनी देखील विशेष पाठपुरावा केला आहे. मात्र सध्या शिंदे फडणवीस दोघांच्या ड्रीम प्रोजेक्ट चा शेतकऱ्यांना फटका बसत असून महाराष्ट्राची समृद्धी की शेतकऱ्यांची बरबादी? असा सवाल नाशिकचा शेतकरी उपस्थित करत आहे. तर आमच्या मागण्या मेनी न केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समृद्धी महामार्गावर येऊ देणार नाही, असा इशारा सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
सरकारने लक्ष द्यावे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच देखरेखीखाली समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान सिन्नर परिसरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी समस्या मार्गी लावण्याची मागणी महामार्ग व्यवस्थापन व सरकारकडे केली आहे. सिन्नर तालुक्यातील वावी, दुशिंगपुर, सायळे, निऱ्हाळे अशा अनेक गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न असून दोघेही सत्तेच्या मुख्य पदावर असल्यानं शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दरम्यान समृद्धीचे पाणी शेतात घुसून नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी करून खात्री केली जाईल. या संदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठवून उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपअभियंता निंबादास बोरसे यांनी दिली आहे.