Nashik Leopard : काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या (Nashik) वनविभागाने शहरातील पाथर्डी परिसरात ऊस तोडणीच्या वेळी सापडलेल्या तीन पिल्लांना बिबट मादी आणि पिल्लांची भेट घडवुन आणली होती. त्यानंतर पुन्हा आईपासून दुरावलेल्या पिल्लाला बिबट मादीच्या स्वाधीन केले आहे. अवघ्या चाळीस मिनिटाच्या आत हे रेस्क्यू ऑपरेशन झाल्याचा सुखद क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला आहे.
नाशिक शहरात बिबट्याचा (Leopard) संचार वाढतच आहे. शिवाय शहर परिसरात मळे परिसर असल्याने बिबट्याचा अधिवासाचा बनला आहे. मात्र अनेकदा बिबटे पाण्याच्या शोधार्थ आल्यानंतर अधांरामुळे विहिरीत पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडल्याची घटना घडली. काही वेळातच शेतकऱ्याने ही बाब वनविभागाला (Nashik Forest) कळविल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेत बिबटयाच्या बछड्याची सुखरूप सुटका केली. त्यानंतर या बिबट्याच्या बछड्यास बिबट मादीकडे रेस्क्यू ऑपरेशननंतर स्वाधीन करण्यात आले. यासाठी संबंधित ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून वनविभाग आणि इको एको संस्थेच्या माध्यमातून पिल्लांची भेट घडवून आणली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिक शहराजवळील पाथर्डी जावाशेजारी वाडीचे राम परिसरात उसाच्या शेतात तीन बछडे आढळून आले होते. नाशिक वनविभाग आणि वन्यजीव प्रेमींचे पथकाने यशस्वीरीत्या या मायलेकांची पुनर्भेट घडवून आणली. रात्रीच्या अंधारात हे बछडे पुन्हा आईच्या कुशीत विसावल्याचा व्हिडीओ देखील समोर आला होता. आता नाशिकच्या सय्यद पिंपरी परिसरात एका विहिरीत मंगळवारी सायंकाळी दोन महिन्याच्या बिबट्याचा बछडा पडल्याची घटना घडली होती. संबंधित शेतकऱ्यांला बिबटयाचा बछडा विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्याने तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सोबत असलेल्या इको एको फाउंडेशन आणि वन विभागाच्या पथकाने नेहमीप्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन करत बछड्याला बाहेर काढले.
विहिरीत पडले असल्याने थंडीने ते कुडकुडत होते, यावेळी वनविभागाने त्याची तपासणी करून बिबट मादीकडे सोपवण्याची योजना आखली. दरम्यान नाशिक वनपरिक्षेत्राचे वनपाल अनिल अहिरराव यांच्या पथकाने परिसरात ट्रॅप कॅमेरे व बछडे व मादीचे मिलन हाेण्यासाठी रणनिती आखण्यात आली. त्यानुसार बछड्याला मायक्रोचिप लावून तेथेच त्यांच्या आईकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. रेस्क्यू टीमने बछड्याची वैद्यकीय तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री केली. त्यानंतर बछड्यास एका टोपलीमध्ये ठेवण्यात आले. कॅमेरा ट्रॅप लावून सुमारे पाचशे मीटर अंतरावर थांबून पथकाने निरीक्षण केले असता, अवघ्या चाळीस मिनिट बिबट मादी आली, तिने सुरक्षितरित्या बछड्यास नैसर्गिक अधिवासात घेऊन गेली.