Nashik Crime : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिवंगत नेते वसंतराव पवार (Vasantrao Pawar) यांची कन्या आणि नाशिकमधील (Nashik) प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ (Ophthalmologists) अशी ओळख असलेल्या डॉक्टर प्राची पवार (Dr. Prachi Pawar) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी (13 डिसेंबर) सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.


प्रवेशद्वारावरील दुचाकी बाजूला घ्या सांगितल्याने आरोंपीना राग


नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन परिसरात डॉ. प्राची पवार आपल्या फार्म हाऊसवर (Farm House) इनोव्हा या चारचाकीने गेल्या होत्या. यावेळी फार्म हाऊसच्या प्रवेशद्वारावर दुचाकी लावलेली त्यांना दिसली. दुचाकी बाजूला घ्या असं त्यांनी सांगितलं. परंतु याचा राग आल्याने अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्यातील एकाने चालकाच्या सीटवर बसलेल्या प्राची यांच्या हातावर दोन ते तीन ठिकाणी धारदार शस्त्राने वार केले. डॉ. प्राची पवार यांनी तात्काळ गाडीच्या काचा लावताच टोळक्याने घटनास्थळावरुन पळ काढला.


अतिरक्तस्त्राव झाल्याने काही काळ डॉ. प्राची पवार बेशुद्ध


प्राची यांनी खाली उतरत आरडाओरड करताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले आणि त्यांनी प्राची यांना नाशिक शहरातील पंडित कॉलनी परिसरातील त्यांच्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडली असून अतिरक्तस्राव झाल्याने त्या बऱ्याच काळ बेशुद्ध देखील होत्या. 


आरोपींचा शोध सुरु


ही घटना समजताच नातेवाईक, डॉक्टर्स आणि परिचित मंडळी रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. या हल्ल्यामगील नक्की कारण आणि आरोपींचा शोध अद्याप लागलेला नसून नाशिक ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.  पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरु केलं आहे. 


नाशिकमधील गुन्हेगारी चव्हाट्यावर


डॉ. प्राची पवार या मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत पवार यांच्या त्या कन्या आहेत. डॉक्टर महिलेसोबत असा प्रसंग ओढावल्याने वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. प्राची पवार यांच्यावर हल्ला झाल्यामुळे नाशिक शहरातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आहे. 


VIDEO : Nashik Crime : नाशिकमध्ये प्रख्यात नेत्ररोगतज्ञ डॉ. प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला