Nashik News : क्रांतिवीर राघोजी भांगरे (Krantiveer Raghoji Bhangre) यांचे स्वातंत्र लढयातील कार्य महान असून त्याच्या कार्याला साजेसे असे स्मारक उभारण्यासाठी अधिकच्या जागेची नितांत गरज आहे. प्रशासन आणि स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून अधिकची जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी डी. गंगाधरण यांनी अशा सूचना केल्या आहे.


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांचा सिहांचा वाटा आहे. राघोजी भांगरे यांनी आदिवासी, शेतकरी यांच्या पिळवणुकीविरुद्ध प्राणपणाने लढा दिला. राघोजी भांगरे यांचे स्मारक व्हावे, चौकाला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथे हे स्मारक बांधण्यात येणार आहे. मात्र सदर ठिकाणी असलेली जागा स्मारकासाठी कमी पडत असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांना सांगितले आहे. 


क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची कर्मभूमी असलेल्या सोनोशी येथे त्यांचे स्मारक व्हावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू असला तरी स्मारकासाठी उपलब्ध असलेली जागा मात्र खूपच कमी आहे. क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक त्यांची कर्मभूमी असलेल्या सोनोशी गावी व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे हे देखील प्रयत्नात आहेत. खासदार गोडसे यांच्या प्रयत्नातून सहा महिन्यांपूर्वी स्मारकाचा प्रस्ताव तयार करणे व प्रस्तावाच्या कामाला गती देणे यासाठी शासनाने सात जणांच्या समितीची स्थापना केलेली आहे. यापूर्वी समितीची एक बैठक झालेली असून समिती आणि प्रशासनाने गेल्या चार महिन्यात स्मारकाच्या प्रस्तावाविषयी नेमके काय काम केले याचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांनी वरील सुचना केल्या .
      
राघोजी भांगरे स्मारक नेमके कसे असायला हवे, स्मारकांमध्ये भांगरे यांच्या कार्याविषयी कोण- कोणती माहिती उपलब्ध असायला हवी याविषयीची सविस्तर माहिती गोळा करून स्मारक भव्य - दिव्य होण्यासाठी इतर क्रांतिकारकांच्या स्मारकांना भेटी देण्याची गरज असल्याचे मत यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरण यांनी व्यक्त केले. स्मारकासाठी सध्या एकच एकरची जागा उपलब्ध असून भव्य - दिव्य स्मारक उभारण्यासाठी अधिकच्या जागेची गरज आहे. अधिकची जागा कशी उपलब्ध होवू शकेल यासाठी प्रशासन आणि समितीचे सदस्य यांनी एकत्रितपणे स्मारकांच्या प्रस्तावित जागेवर प्रत्यक्ष जाउन पाहणी करावी अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी केल्या आहेत.