Nashik News : एसटीचे ऑनलाईन तिकीट काढूनही प्रवासादरम्यान प्रवाशाकडून अतिरिक्त पैसे वसूल करणे एसटी महामंडळाला चांगलेच महागात पडले आहे. प्रवाशाच्या तक्रारीवरून ग्राहक आयोगाने एसटी महामंडळाला धारेवर धरले असून प्रवाशाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 


काही दिवसांपूर्वी नाशिकहून अहमदाबादसाठी आकाश शिरोरे नामक युवकाने प्रवास केला होता. यावेळी त्याने प्रवास करण्यासाठी बसचे सीट रिझर्व करूनही त्याच्याकडून अतिरिक्त 80 रुपये शुल्क आकारले, याचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. ग्राहक तक्रार आयोगाने प्रवासाला झालेला मानसिक त्रास आणि अर्जाचा खर्च असे एकूण आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश महामंडळाला दिला आहे 


नाशिक येथील आकाश शिरोरे हा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईचा विद्यार्थी असून नोव्हेंबर 2019 मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अनुचित व्यापार प्रथेविरुद्ध झालेल्या त्रासाची तक्रार देत पन्नास हजार रुपयांच्या भरपाईची मागणी केली होती. शिरोरे यांच्या म्हणण्यानुसार 12 सप्टेंबर 2019 रोजी आकाशाने महामंडळाच्या बसचे स्लीपर रेडबस अँपवरून नाशिक ते अहमदाबाद असे तिकीट बुक केले होते. दि.13 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष प्रवास करताना कंडक्टरने बुक केलेल्या सीटवर अधिभार शुल्क 80 भरावा लागेल असे सांगितले. यानंतर शिरोरे यांनी अतिरिक्त शुल्क भरून प्रवास केला. 


दरम्यान या प्रकारानंतर शिरोरे यांनी महामंडळाच्या ऑनलाईन वेबसाईटवर तक्रार दाखल केली होती. तसेच आगार व्यवस्थापक आणि विभागीय नियंत्रक यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली होती. मात्र अधिभाराबाबत कोणतेही स्पष्टीकरण संबंधितांकडून न मिळाल्याने त्याने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. ग्राहक आयोगाला घटनेची सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी आयोगाने एसटी महामंडळास नोटीस बजावली. मात्र ग्राहक आयोगाने बजावलेल्या नोटीसला महामंडळाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्याने ग्राहक तक्रार आयोगाने तक्रारकर्ता शिरोरे यास नुकसान भरपाई देण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत. 


अशी आहे भरपाई 
ग्राहक तक्रार आयोगाने शिरोरे यास आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. यामध्ये पाच हजार रुपये मानसिक त्रासासाठी तर तीन हजार रुपये अर्जासाठी झालेल्या खर्चासाठी असे एकूण आठ हजार रुपये अदा करण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत.  


तक्रारकर्ता आकाश शिरोरे म्हणाले कि, चुकीच्या पद्धतीने किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जात असेल तर त्या विरोधात नक्कीच दाद मागितली पाहिजे. अशा पद्धतीने प्रवाशांची अडवणूक होत असेल तर त्यांनी ग्राहक तक्रार आयोगाकडे दाद मागितली पाहिजे. न्याय नक्की मिळतो आणि यंत्रणेला ही त्यांची चूक लक्षात येते. यातून सुशासन निर्माण होण्यास मदतच होते.