Nashik Rain : नाशिकच्या (Nashik) शहर परिसरातील भगूरजवळील (Bhagur) वंजारवाडी येथे मध्यरात्री घर कोसळून पती पत्नी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.. छबु सीताराम गवारी आणि त्याची पत्नी मंदाबाई गवारी हे दोघे जण या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. पावसामुळे घराचा पाया कमकुवत होऊन घर कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
नाशिक शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वंजारवाडी गावात गुरुवारी रात्री अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे एका घराची भिंत कोसळल्याने पहाटे तीन वाजेच्या सुमारास पती-पत्नीचा मृत्यू झाला. वंजारवाडी येथे आठ दिवसांपूर्वी ढगफुटी सदस्य पाऊस होऊन दीडशे ते दोनशे हेक्टर जमीन वाहून गेली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी रात्री नाशिक शहरासह परिसरात अति जोरदार पाऊस झाला. वंजारवाडी येथेही सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता.
दरम्यान या मुसळधार पावसाची उद्याच्या शेतकामाची आखणी करून गाढ झोपी गेलेल्या पती पत्नीवर काळाने घाला घातला आहे. या पावसात वंजारवाडी परिसरात असलेल्या लालवाडी शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे. लालवाडीत असणाऱ्या गवारी कुटुंबाचा घरासह आयुष्याचा पायाच उध्वस्त झाला आहे. छबु सिताराम गवारी यांच्या घराची पहाटे तीन वाजता अचानक भिंत कोसळली. यामध्ये छबु सिताराम गवारी (वय 42) आणि मंदाबाई छबु गवारी( वय 35) यांचा झोपेतच मृत्यू झाला. रात्री हा प्रकार लवकर लक्षात आला नाही.
सकाळी घडला प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. दरम्यान आठच दिवसांपूर्वी सिन्नर परिसरात झालेल्या अतिवृष्टीनंतर नुकसानग्रस्त पाहणी करण्यात आली होती. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री गिरीश महाजन आदींनी या ठिकाणी भेटी देत मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर गुरुवारच्या रात्री मुसळधार पावसाने वंजारवाडी येथील नवरा बायकोचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यानंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. आता दोन जणांचा बळी गेल्यानंतर शासनाला जाग येते की नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तसेच सिन्नर तालुक्यात दोन गावांमध्ये वीज पडून तीन गाईंचाही मृत्यू झाला आहे.
गुरुवारच्या पावसाचा कहर
दरम्यान गुरुवारी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामध्ये सिन्नर, त्र्यंबकेश्वर आदी भागात मुसळधार पाऊस बरसला. तर नाशिक शहरातही काही तासांत झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केल्याचे पाहायला मिळाले. अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. तर जुन्या नाशिकमध्ये विजेच्या खांबाचा विद्युतप्रवाह पाण्यात उतरल्याने येथून जाणाऱ्या एका युवकाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे गुरुवारच्या पावसाने तीन जणांचा बळी घेतला आहे.