Nashik Grampachayat Election : राज्यातील सत्तातरानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकांना (Grampanchayat Election) अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चार तालुक्यातील 187 ग्रामपंचायतींसाठी 82.27 टक्के मतदान झाले. आज दहा वाजेपासून संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहेत. 


नाशिक जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीपैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 187 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साडे सात वाजेपासून मतदानाला सुरवात झाल्यानंतर मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. यंदा सरपंच पदाची निवडणूक जनतेच्या मतदानावर आधारित असल्याने चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. आता मतमोजणीला सुरवात झाली असून लवकरच गावचा कारभारी ठरणार आहे. संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत असून आज कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


दरम्यान पेठ तालुक्यातील 69 ग्रामपंचायतींसाठी 82.68 टक्के, इगतपुरीतील पाच ग्रामपंचायतींसाठी सर्वाधिक 84 टक्के, त्र्यंबकेश्वर मधील 54 ग्रामपंचायतींसाठी 83.06 तर सुरगाणातील 59 ग्रामपंचायतींसाठी 79.36 टक्के मतदान झाले. सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली. मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून व्यवस्था करण्यात आली होती. वयोवृद्ध मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला दुपारी दीड पर्यंत 63 टक्के मतदान झाले होते दुपारी साडेतीन पर्यंत मतदान ची टक्केवारी 72.60 पर्यंत पोहोचली 11 ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी सरपंच अविरोध निवडून आले आहेत. पेठ तालुक्यातील नाचलोंडी, सुरगाण्यातील अलंगून, मोहपाडा आणि त्र्यंबकेश्वर मधील जातेगाव, पिंपळद आणि सारस्ते ग्रामपंचायत सरपंच पदासह बिनविरोध झाल्या आहेत. त्यानंतर 187 ग्रामपंचायतींमध्ये 11 ठिकाणी सरपंच तर 812 सदस्य बिनविरोध झाले आहेत. 


दरम्यान 187 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारासह कार्यकर्त्यांच्या नजर मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. शिवाय मतमोजणीनंतर कुणाच्या पारड्यात जनतेचा कौल जाणार? जनता कुणाला गावाचा कारभारी करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे काही तासांत मिळणार असल्याने उमेदवारांसह कार्यकर्ते पाण्यात देव ठेऊन असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकांत झालेल्या पावसामुळे निवडणूक मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. मात्र कालच्या मतदान प्रक्रियेत कोणताही खंड न पडता  मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. 


युवा उमेदवारांचा उत्साह 
यंदा ग्रामपंचायत निवडणुकांसाठी युवा उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर दिसून आला. गावागावात गेल्या अनेक वर्षांपासून जेष्ठ नेत्यांचे राजकारण दिसून येत होते. मात्र या सर्वाना छेद तरुणांनी एकत्र येत यंदाची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सरपंचासह नव्या पॅनलची निर्मिती पाहायला मिळाली. त्यामुळे गावच्या राजकारणात आता जुने मागे सोडत आता नव्या उमेदीचे युवा सहभागी होत असल्याचे चित्र आहे.