Nashik News : नाशिक (Nashik) बस दुर्घटनेनंतर (Bus Accident) पोलीस एक्शन मोडवर आले असून खासगी बसेसवर कारवाईची मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. नाशिक पोलिसांनी आखून दिलेल्या सहा चेकपॉईंटवर दिवसभरात 31 बसेसवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास 76 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी बसेस चालकांनी तसेच ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी नियमांच्या अधीन राहून वाहतूक करावी, असे आवाहनच आता नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) तपोवन परिसरात खासगी बस ट्रॅव्हल्सचा भीषण (Nashik Bus Fire)  अपघात झाला. यामध्ये बसला आग लागल्याने तब्बल बारा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करत चौकशीचे आदेश दिले. त्याचबरोबर अपघात चौफुलीवर योग्य त्या सुविधा करण्याच्या सुचनांसह पोलीस प्रशासनाला खासगी ट्रॅव्हल्स संदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यांनुसार दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी सर्व यंत्रणांना सहभागी करून घेत या विषयावर बैठक घेतली. त्यानुसार शहरातील महत्वाच्या ठिकाणी चेकपॉईंटसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 


दरम्यान बैठकीनंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) प्रदीप शिंदे यांनी सर्व खासगी प्रवाशी वाहन मालक, व्यवस्थापक यांना मार्गदर्शन व सूचना देऊन बेकायदेशीर वाहतूक न करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार शहरातील दिंडोरी रोड जकातनाका, पेठरोड जकातनाका, शिलापूर टोलनाका, शिंदे पळसे टोलनाका, 9 वा मैल मुंबई आग्रा, गौळाणे फाटा इत्यादी सहा पॉईंटची निवड करून सदर ठिकाणी  प्रत्येक पॉईंटवर पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी, 2 पुरुष अंमलदार, 01 महिला अंमलदार, शहर वाहतूक शाखेकडील 02 अंमलदार व प्रादेशिक परिवहन विभागाकडील 01अधिकारी नियुक्त करण्यात आले. 


यानुसार शहरातील सहा पॉइंटवर मागील 24 तासांत अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस वर कारवाई करण्यात आली. यामध्ये 117 बसेस तपासून 31 बसेसवर कारवाई करण्यात आली. खासगी बसेसवर कारवाई करून जवळपास 76 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच एक खासगी ट्रॅव्हल्स बस प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जमा करण्यात आली आहे. तरी सर्व खासगी बस मालक, व्यवस्थापक यांनी कोणत्याही प्रकारे नियमबाह्य प्रवाशी वाहतूक करू नये असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईमउळे आतातरी वाहनचालकांनी अवैध वाहतूक टाळून, बेदरकारपणे वाहन न चालविता नियमात राहून वाहतूक करणे क्रमप्राप्त राहणार आहे, अन्यथा नाशिक पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.