Nashik Wedding Theft : नाशिक (Nashik) शहरात सध्या धुमधडाक्यात लग्नसराई (Wedding Festival) सुरु असून हॉल, लॉन्स, मैदाने पुढील काही महिने फुल्ल आहेत. अनेकजण विवाह सोहळ्याला वारेमाप खर्च करताना पाहायला मिळतात. तर अनेकजण लग्नात नटून थटून हजेरी लावतात. मात्र हीच हजेरी महागात पडू शकते. मागील आठवडाभरात नाशिक शहरातील प्रसिद्ध लॉन्स मधून लाखोंच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरीचे (Theft) प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे शुभमंगल पण सावधान म्हणावं लागणार आहे. 


सध्या नाशिक शहरात लग्नसराईला उधाण आले आहे. गंगापुर रोड (Gangapur Road), औरंगाबाद रोड, पाथर्डी परिसरात अनेकानेक भव्य लॉन्स पाहायला मिळतात. या ठिकाणी सायंकाळच्या लग्नाची धूम पाहायला मिळते. मग वधू वरांकडून हॉल भाडे, डेकोरेशन सेट, जेवण, फोटोग्राफी, दागिन्यांवर वारेमाप खर्च केला जातो. त्याचबरोबर वऱ्हाडी मंडळीही आपल्या तोऱ्यात असते. मात्र हाच वारेमाप खर्च हेरून चोरटयांनी लग्न समारंभ टार्गेट केले आहेत. लग्नसोहळ्यांमध्ये चोऱ्या करणाऱ्या परराज्यातील अनेक टोळ्या सध्या नाशिक शहरात ठाण मांडून बसल्याची शक्यता आहे. या टोळ्यांतील लहान मुले आणि महिलांची तुमच्या लग्नसमारंभावर नजर असू शकते. कारण गेल्या आठवडाभरात नाशिक शहरातील लॉन्समधून दागिने चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला देखील चोरटयांनी गंडवलं आहे. 


02 डिसेंबरची घटना 
नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील सेलिब्रेशन लॉन्स येथे लग्न सोहळ्यात वऱ्हाडी म्हणून आलेल्या इंदूर येथील महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. या पर्समध्ये 35 हजारच्या रोकडसह मोबाईल असा एकूण 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळवला. दरम्यान या चोरीची तक्रार रत्ना दिलीप दिंडोरकर यांनी दाखल केल्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरकर या गुरुवारी नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त नाशकात आल्या होत्या. औरंगाबाद रोडवरील सेलिब्रेशन लॉन्सचे ते रात्रीच्या समोरच लग्नातील धार्मिक विधी सुरू असताना त्या वधू वरच्या स्टेज जवळ जाऊन बसल्या. याच दरम्यान त्यांच्या पर्स लांबवल्याची घटना घडली. दिंडोरकर यांचे लक्ष नसल्याचे संधी साधत चोरट्याने ही पर्स पळवल्याचे सांगितले. या पर्समध्ये 35 हजाराची रोकड दोन कानातील टॉप्स जोड आणि मोबाईल असा सुमारे 67 हजार रुपयांचा ऐवज होता.


06 डिसेंबरची घटना 
लहान भावाच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने नाशिकला आलेल्या मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेच्या पर्सवर चोरट्याने डल्ला मारत 3 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. पूर्व मुंबईतील रहिवासी असलेल्या कल्याणी गाडे या 5 डिसेंबरला भावाच्या विवाह सोहळ्यासाठी नातेवाईकांसोबत नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील जय शंकर फेस्टिव्हल लॉन्समध्ये आल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम आटोपून जेवणासाठी जात असतांना त्यांच्या मावशीने कल्याणी यांची पर्स एका खुर्चीवर ठेवली आणि काही सेकंदातच अंदाजे 18 ते 22 वर्षीय मुलाने ती पर्स लांबवली. लॉन्स मधील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले असता पर्स चोरी झाल्याचे लक्षात येताच कल्याणी गाडे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.


07 डिसेंबरची घटना 
लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात एका महिलेच्या पर्समध्ये ठेवलेल्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना हनुमान वाडीतील धनदाई लॉन्समध्ये घडली. विजया नंदकुमार कुलथे या त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला रात्री पावणेनऊ वाजेच्या दरम्यान धनदाई लॉन्स येथे गेल्या होत्या. त्यांच्याकडे असलेल्या पर्समध्ये 70 हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल फोन असा 4 लाख 56 हजार रुपयांचा ऐवज ठेवला होता. कुलथे यांनी पर्स त्यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर ठेवली होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने सदरहू पर्स त्यांची नजर चुकवून लंपास केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.