NIA Raids PFI : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉपुलर फंड ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर (PFI) देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबादसह (Aurangabad) इतर ठिकाणी छापेमारी सुरू आहे. अशातच बीड, पुणे, मालेगाव (Malegaon) येथून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चार जणांना नाशिकच्या एटीएस (Nashik ATS Office) कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना थोड्याच वेळात नाशिक (Nashik) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात ठिकठिकाणी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने रात्री तीन वाजता नवी मुंबईतील (Mumbai) नेरूळमधील पीएफआय च्या कार्यालयावर छापा मारला. तर पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद मधून देखील एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर संवेदनशील समजले जाणाऱ्या मालेगाव मधून देखील सैफुर रहमान यास एटीएसने ताब्यात घेतले आहे.
मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुडको कॉलनी परिसरातील घरातून सैफुर रहमानला आज पहाटे चारच्या सुमारास एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. सैफुरला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन भद्रकाली परिसरातील एटीएस कार्यालयात त्याला आणण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पथकाकडून कार्यालयात त्याची कसून चौकशी केली जात आहे. सैफुरवर मालेगावला यापूर्वी काही आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. PFI चा नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच राज्यसंघटनेचेही त्याच्याकडे पद असल्याची चर्चा आहे.
दरम्यान या छापेमारी बाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली असून त्यामुळे अद्याप अधिकृत माहिती पुढे आली नाही. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून ही छापेमारी सुरू करण्यात आले आहे. पीएफ आईचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय कोंढवा भागात आहे. या ठिकाणी काही प्रशिक्षण केंद्र चालवले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
पुणे, बीड मधील संशयित नाशिकमध्ये
दरम्यान बीड, पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताना नाशिकच्या एटीएस कार्यालयात ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील दोघे, बीडमधील एक व मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आलेला एक जण अशा चौघांना थोड्याच वेळात नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान मालेगावमध्ये ईडी आणि छापे टाकले असून यात एकाला अटक करण्यात आले आहे. पहाटे एनआयए च्या टीमने राज्यभरात अनेक ठिकाणी मुस्लिम संघटना असलेल्या पॉप्युलर फंड ऑफ इंडियावर रात्री तीन वाजता छापेमारी सुरू केली.