Bharati Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रस्त्यांच्या कामासंदर्भात सरकारला जाब विचारला होता. यावर मंत्री भारती पवार (Minister Bharati Pawar) यांनी उत्तर देतांना सरकार कोसळल्यानंतर रस्त्यांची आठवण आली का? असा सवाल करत विरोधकांकडून आता सरकारवर ताशेरे ओढण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या (Nashik Divisional Office) नियोजन सभागृहात दिशा समितीच्या बैठकीत केंद्रीय योजनांचा आढावा (Central Government Scheme) घेतांना केंद्रीय मंत्री भारती पवार त्या बोलत होत्या. डॉ. भारती पवार यांनी यावेळी विभागाचा आढावा घेतांनाच विरोधकांवर हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी अजित पवार राज्यातील रस्त्यांसंदर्भात सरकारची कान उघडणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री पवार यांनी अजित पवार यांना खडे बोल सुनवले आहेत. सरकार कोसळल्यानंतर रस्त्यांची रस्ते आठवले का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. मविआचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन झाले आहे. त्यानंतर मात्र विरोधकांना आता मोकळा वेळ मिळालेला आहे. त्यामुळे सरकारवर ताशेरे ओढण्याचे काम सुरु असल्याचे भारती पवार म्हणाल्या.
मंत्री भारती पवार पुढे म्हणाल्या ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उप केंद्रे सक्षम करण्यात यावी. तसेच ज्या आरोग्य केंद्राच्या इमारती जुन्या झाल्या असतील त्यांचे नुतनीकरण करण्यात यावे. जिल्ह्यात 410 हेल्थ वेलनेस सेंटर असून वैद्यकीय महाविद्यालय, संदर्भ रुग्णालयातही आरोग्य केंद्रे जोडण्यात यावीत. ग्रामीण भागातील प्रत्येकाला आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे मातृत्व वंदना, जननी सुरक्षा, जननी शिशु सुरक्षा योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांना होण्यासाठी या योजना संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामीण, प्राथमिक, उपविभागीय आरोग्य केंद्रांमध्ये माहिती फलक लावण्यात यावेत, अशा सूचनाही डॉ.पवार यांनी दिल्या.
प्रधानमंत्री पीक विमा योजना 2021-22 वर्षात साधारण 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला असून यातील 89 हजार 357 शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली होती. यातील पीक विम्याचा लाभ न मिळालेच्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येवून त्यांनाही लाभ कसा देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात यावा. त्याचप्रमाणे 2022-23 या वर्षासाठी 1 लाख 65 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला असून याअंतर्गत साधारण 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित होणार आहे. पीक विमा योजनेंतंर्गत संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नियोजन करावे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत 2021-22 मध्ये साधारण 17 कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले आहे, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.
नंदुरबारच्या धर्तीवर ॲप विकसित करावे
रोजगारासाठी कुटुंबासोबत बालकांचे स्थलांतर होत असते. या बालकांचे कुषोषण टाळून त्यांच्यातील अतितीव्र व मध्यम कुपोषित बालके शोधण्यासाठी नंदूरबारच्या धर्तीवर ॲप विकसित करण्यात यावा. जेणेकरुन या ॲपच्या माध्यमातून बालकांच्या पोषण आहार आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते नियोजन करता येईल. तसेच स्थलांतरीत कुटुंबाना घरकुल योजना, जनधन योजना, मनरेगा अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभ उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या एक मूठ पोषण उपक्रमातून अतितीव्र व मध्यम कुपोषित बालकांना चांगला परिणाम दिसून येत आहे, असेही यावेळी डॉ.पवार यांनी सांगितले.