Nashik Igatpuri Accident : नाशिक-मुंबई महामार्ग (Nashik Mumbai Highway) अपघाताचे केंद्र बनला आहे. भरधाव धावणाऱ्या वाहनामुळे रोजच अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच इगतपुरीजवळ (Igatpuri) बोरटेंभे शिवारात नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने धडक दिली. या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू (Driver Death) झाला असून बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. 


मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) इगतपुरी जवळ शुक्रवारी (7 एप्रिल) पहाटेच्या सुमारास बोरटेंभे शिवार येथील पोद्दार स्कुलसमोर हा ट्रक नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता. खबरदारी म्हणून ट्रकच्या आजूबाजूला सेफ्टी कोन लावण्यात आले होते. तर ट्रकचालक हा ट्रकच्या दुरुस्तीचे काम करत होता. अशातच मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जाणारी खासगी ज्वेल फिश ट्रॅव्हल्सची बस थेट उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून अन्य 11 प्रवासी जखमी झाले आहेत. तर ट्रकची दुरुस्ती करत असलेल्या ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. 


ट्रकचा अंदाज न आल्याने जोरदार धडक  


मुंबईहुन (Mumbai) निघालेली खासगी प्रवासी बस नाशिकमार्गे शिर्डी साईबाबांच्या (Shirdi Saibaba) दर्शनाला जात होती. पहाटेच्या सुमारास इगतपुरी जवळ आली असता बोरटेंभे येथे नादुरुस्त स्थितीत ट्रक उभा होता. खासगी लक्झरी बसच्या चालकाला पुढे असणाऱ्या उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ट्रकमागे काम करणारा चालक मेहमूद सुभेदार शेख हा जागीच ठार झाला. तर बस चालक महेंद्र पाल हा गंभीर जखमी झाला. तसेच शिर्डी दर्शनासाठी जाणारे बसमधील इतर 11 प्रवाशीही जखमी झाले आहे. अपघात एवढा भीषण होता की, बसची समोरील बाजू पूर्णतः कापून गेली. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस पथक आणि टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. 


वाहतूक सुमारे चार तास ठप्प


दरम्यान जखमींना घोटी टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेतील जखमीपैकी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेले तपोव गुप्ता, एतेवर देव गुप्ता, शरद कुमार गुप्ता, थॉमस त्रिभुवन हे सर्व मुंबई येथील रहिवासी आहेत. तर काही जखमी प्रवाशांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे चार तास ठप्प झाली होती. स्थानिक महामार्ग सुरक्षा पोलीसांनी इगतपुरी शहरातुन वाहतूक वळवून काही तासांत महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.