Nashik AC Poultry Farm : गेल्या काही वर्षात निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारभावात होणारा चढ-उतार यामुळे शेती व्यवसाय सध्या 'धोक्यात' येवू लागला आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा असावा म्हणून शेतकरी वर्ग पोल्ट्री फार्म या व्यवसायाकडे वळला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात अत्याधुनिक व वातानुकुलित पोल्ट्री फार्म (Poultry Farm) उभारला असून महिन्याकाठी तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळवू लागला आहे.
गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीपिकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. शेतात राबून उत्पादन तयार करायचं. हाती उत्पादन यायची वेळ आली की, निसर्गाने ते हिरावून न्यायचं... अशी परिस्थिती सध्या पहावयास मिळत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यावर मात करण्यासाठी जोडधंदा म्हणून अनेक आव्हानांना तोंड देत पोल्ट्री व्यवसायात शेतकऱ्यांनी आपला पाया भक्कम केला आहे. मात्र अनेकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा पोल्ट्री व्यावसायिकांना देखील बसत आहे. कधी वातावरणानुसार पक्षांची वाढ होत नाही तर कधी रोगाचा प्रादुर्भाव होवून अनेक पक्षी दगावले जातात. यावर उपाय म्हणून नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक व वातानुकुलित असा पोल्ट्री फार्म उभारलाय.
तसेच, साधारण पोल्ट्री फार्मपेक्षा वातानुकुलित पोल्ट्री फार्म उभारल्याने शेतकऱ्याचे अनेक फायदे होतात. पोल्ट्री फार्म उभारल्यानंतर पक्षांना खाद्याची आवश्यकता असते. मात्र वातानुकूलित पुलंतरी फार्म उभारल्यास खाद्याची नासाडी थांबते, खाद्य टाकण्यासाठी एका माणसाचा वेळ वाचतो. शेडमध्ये दीडपट अधिक पक्षी ठेवणे शक्य होते. उन्हाळ्यात होणारी पक्ष्यांची मरतूक, व्हायरल इन्फेक्शन चे धोके कमी होतात. वातानुकूलित पोल्ट्रीमुळे उग्रवासाच्या त्रासापासून परिसरात सर्वांना सुटका मिळते.स्वयंचलित यंत्रणेमुळे पाणी सांडत नसल्याने शेड कोरडे राहत असल्याने माशाही येत नाहीत. परिणामी पक्ष्यांची वाढ होण्याचा कालावधी संरक्षित वातावरणामुळे सुमारे 8 ते 10 दिवसांनी कमी होवून 42 ते 45 व्या दिवशी मिळणारे आवश्यक वजन 35 व्या दिवशीच मिळते. त्यामुळे 35 दिवसांची एक बॅच गेली की एक ते सव्वा लाख रुपये खर्च वजा जाता महिन्याकाठी हमखास दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते.
दरम्यान साधारण दहा हजार पक्षांचा वातानुकूलित पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी सुमारे 60 ते 70 लाख रुपये एवढा खर्च येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याजवळ भांडवल उपलब्ध होत नाही. म्हणून वातानुकूलित पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी शासनाने कर्ज किंवा अनुदान रुपी मदत केल्यास निश्चितच पोल्ट्री व्यवसाय एक अग्रगण्य व्यवसाय म्हणून ओळखला जाईल आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी हक्काचं उत्पन्नाचे साधन बनेलं, अशी प्रतिक्रिया पोल्ट्री व्यावसायिक संदीप सोनवणे यांनी दिली.