Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rains) हजेरी लावत आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तर नंदुरबारमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अन्य जिल्ह्यातही द्राक्ष, आंबा, संत्रा, रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. 


राज्यातील नाशिक, नंदुरबार, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. आधीच सातत्यानं बदलत जाणाऱ्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसत असताना त्यात पुन्हा अवकाळी पावसानं भर घातल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया जात आहेत.  


नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस, शेती पिकांचं नुकसान


नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या अवकाळी पावसामुळे कांदा, भाजीपाला, आंबा तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे. जनावरांचा चाराही भिजल्याने पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.


नांदेड जिल्ह्यातही अवकाळी 


नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मुदखेड इथल्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं. मुदखेड शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचलं असून रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मुदखेड शहरातील वाहतुकीचा खोळंबा झाला.


लातूर जिल्ह्यात जोरदार अवकाळी रब्बी पिकांचे नुकसान 


लातूर जिल्ह्यातील जळकोट शहर आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जळकोट तालुका आणि परिसरामध्ये काही ठराविक कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाला आहे. या पावसामुळं आंब्याच्या बागेचं आणि भाजीपाला शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पावसामुळे रब्बी ज्वारी, कांदा तसेच हळद पिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांची हळद उघड्यावर आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कापसाचे भाव देखील कमी झाले आहेत, सोयाबीनही गडगडले आहे. सातत्यानं बदलत जाणाऱ्या हवामानाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.