Nashik News : नाशिकच्या (Nashik) अंबड परिसरात मंगळवारी सकाळी उद्योजक नंदकुमार आहेर यांची कंपनीच्या गेटसमोरच चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत हत्या (Murder) केली होती. दरम्यान या घटनेनंतर उद्योजकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या हत्येच्या निषेधार्थ सर्व औद्योगिक संघटनांची आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्यूफॅक्चर असोसिएशनच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. 


नाशिकच्या अंबड औद्योगिक परिसरात असणाऱ्या किर्लोस्कर कंपनीजवळ आज सकाळी उद्योजक नंदकुमार आहेर यांची धारदार शास्राने हत्या करण्यात आली. या घटनेने शहर हादरल. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासांत सिनेस्टाईल हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. नंदकुमार आहेर हे सकाळी कंपनीत आले असता दबा धरून बसलेल्या तीन ते चार जणांच्या टोळीने त्यांच्या गंभीर हल्ला केला. यात आहेर यांचा मृत्यू झाला. या घटनेतील एका संशयिताच्या आईला कंपनीत कामावर असतांना मयत नंदकुमार यांच्याकडून त्रास दिला जात होता. याचाच राग मनात धरत आईच्या मुलाने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.


दरम्यान या घटनेने अंबड औद्योगिक परिसरात संतापाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर औद्योगिक संघटनांची आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्यूफॅक्चर असोसिएशनच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीला पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरेंसह वरिष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने नाशिकमध्ये नविन उद्योग येणार नाहीत अशी देखील भीती या बैठकीत पोलिसांसमोर व्यक्त करण्यात आली. 


तसेच अंबड औद्योगिक वसाहत मोठ्या जागेवर उभी असल्याने एमआयडीसी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, बंद असलेल्या पोलिस चौक्या सुरू करण्यात याव्या यासोबतच खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. पोलिसांनी आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर दोनच दिवसात उद्योजकाकडून मोर्चाचे आयोजनही करण्यात येणार आहे.


नाशिकची अंबड औद्योगिक वसाहत 
नाशिकची अंबड औद्योगिक वसाहत ही राज्यातभरात नावाजलेली वसाहत असून येथे लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. नाशिकसहक, जळगाव, धुळे, मराठवाडा आदी परिसरातील नागरिक उदरनिर्वाहासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत आपले बस्तान मांडतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अंबड परिसरातही गुन्हेगारी वाढली असून कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.