Majha Impact : नाशिकच्या पेठ तालुक्यातील बोरीची बारी येथे पाणी भरताना महिला विहिरीत कोसळली. यानंतर एबीपी माझाने थेट गावात धडक घेत घटनस्थळाच्या ग्राऊंड रिपोर्ट केला. माझाच्या बातमीनंतर प्रशासन जागे झाले असून पाणी पुरवठ्याच्या साहित्यासह स्थानिक तालुका अधिकारी आदिवासी पाड्यावर पोहचले असून तसेच इगतपुरीतील खैरेवाडी येथील भीषण पाणी टंचाई एबीपी माझाने दाखवली होती. या ठिकाणी देखील प्रशासन पोहचले आहे.
दरम्यान कुंभाळे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोरीची बारी येथील महिलेचा व्हिडीओ एबीपी माझाने दाखवला. येथील महिला पाणी भरताना खोल विहिरीत कोसळली. सुदैवाने ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने या महिलेला दोराच्या साहाय्याने बाहेर काढले. महिला विहिरीत पडल्याचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला. त्यानंतर तातडीने एबीपी माझाची टीम बोरीच्या बारीला पोहचली. या ठिकाणच पाणीटंचाईचं भयाण वास्तव जगासमोर आणलं. येथील महिला हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालत असल्याचा व्हीडिओ एबीपी माझाने पुढे आणला.
तसेच इगतपुरी येथील खैरवाडीत भीषण पाणीटंचाई सह महिलांना पाणी आणण्यासाठी रस्ताच नसल्याची परिस्थिती एबीपी माझाने पुढे आणली. दरम्यान या ठिकाणी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून जेसीबी, पाण्याची टाकी साधनसामग्रीसह तहसीलदार, गटविकास अधिकारी खैरवाडीत दाखल झाले आहेत. येथील महिला, ग्रामस्थांना रोज पाण्यासाठी वणवण करावी लागत असून गाळ मिश्रित गढूळ पाणी तहान भागविण्यासाठी वापरले जात होते. रस्ताच नसल्याने टॅंकरची जाऊ शकत नव्हता. मात्र आता सर्व अधिकारी पोहचले असून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे.
पेठ तालुक्यातील बोरीची बारी गावातही अधिकारी पोहचले असून पाणी टंचाई संदर्भात ग्रामस्थांसोबत बैठक घेण्यात आली आहे. येथील महिला पाणी भरताना तोल जाऊन विहिरीत पडल्याचे वृत्त एबीपी माझाने प्रसारित केले होते. त्यानंतर एबीपी माझाच्या वृत्ताची तत्काळ दखल घेत प्रशासन ग्रामस्थांच्या मदतीला पोहचले आहे. एबीपी माझाने दिलेल्या बातमीनंतर काही तासांत कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन गावातील ग्रामस्थांच्या व्यथा एबीपी माझाने मांडल्या आणि दोन्ही गावात अधिकारी दाखल झाले असून पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला
नाशिक जिल्ह्यातील पेठ व इगतपुरी हे दोन्ही भाग विकासापासून कोसो दूर आहेत. या गावांमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही रस्ते, पाणी या मूलभूत सोयी उपलब्ध नाहीत. आजही अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा होत असून नागरिकांना त्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता पाणी टंचाईची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन जागे झाले असून प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला लागली आहे.