Nashik Ramshej Fort : नाशिक (Nashik) जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळख असलेल्या रामशेज किल्ला (Ramshej Fort) सर्वांनाच सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडच्या वर्षात किल्ल्यावर वणवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच दुर्ग संवर्धकांच्या मोहिमेत अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि खोलगट अशा अकरा गुहा आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर या गुहांमध्ये अनेक दुर्मिळ वनौषधीसह पक्षी आढळून आले आहेत. 


नाशिक येथील दुर्गअभ्यासक संस्था असलेल्या शिवकार्य गडकोटच्या (shivkarya Gadkot) माध्यमातून रामशेज किल्ल्यावर मोहीम राबवण्यात आली. यावेळी दुर्गसंवर्धकांनी रामशेजच्या कड्याकपारींचा चहूबाजूंनी अभ्यासात्मक शोध घेतला. त्यात एकूण अकरा गुहांसह अतिशय दुर्मिळ वनस्पती, वनौषधी वृक्ष व विविध पक्षी आढळले. कडाक्याच्या उन्हात यावेळी दुर्गसंवर्धकांनी तीन गट तयार करुन दिवसभरात ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. यापुढे या मोहिमेचा दुसरा टप्पा होईल, असे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ यांनी सांगितले. 


नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या या मोहिमेत रामशेजच्या सर्व बाजूंनी ऐतिहासिक, नैसर्गिक पाऊलखुणा, दुर्मिळ जैवविविधतेच्या शोध लागला. यावेळी अकरा गुहांसह मध्यभागी विविध पळींमध्ये असंख्य कातीव दगड, गोलाकार दगड आढळले. रामशेज युद्धात वापरलेले दगड, गोटे अधिक प्रमाणात किल्ल्यावर सर्वत्र दिसतात तर घातलेले बांधकामाच्या असंख्य दगड घळीत पडलेले आहेत. तर किल्ल्याच्या चहूबाजूंनी पिंपळ, बाभूळ, काटे साबर, भोकर, देवस, अडुळसा, गुर्तुली, शेकडो वर्षे जुने उंबराचे झाड, चिंच, चिलार, कोरफड, साबर, हिवर सिंदल, चाफा, करवंद, रानमोगरा तसेच पश्चिम पोटात वनविभागाने लावलेली बांबू व सागाची काही झाडे आढळली. या वृक्षांत बहुतांशी दुर्मीळ वनस्पती औषधी प्रकारातील आहे. काही फुले, फळे देणारे व काही जाळी, कुंपण तयार करणारे वृक्ष आहेत. या ठिकाणी दरवर्षी लागणाऱ्या वणव्यामुळे या दुर्मिळ वनस्पतींसोबत येथील मोर, दुर्मिळ लाहुरी पक्षी, गुहेत असणारा ससाणा विस्थापित होत आहे, याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. या किल्ल्यावर वणवा कसा लागतो, याचा शोध वनविभागाने घ्यावा, अशी मागणी दुर्ग आणि वृक्षमित्रांनी यावेळी केली. 


रामशेजच्या माथ्यावर दोन दशकांपासून आम्ही शिवकार्य गडकोट मोहिमेद्वारे राबतो आहे. त्यातूनच रामशेजच्या अभेद्य कातीव कड्यातील पोटात असलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यात यश आले. एकूण अकरा पुरातन, नैसर्गिक गुहा आढळल्या. त्यात सैनिक टेहळणीसाठी बसू शकतील व वन्यजीवही आश्रयास असू शकतील, अशा त्या गुहा आहेत. आजूबाजूला असंख्य दगडगोटे, कातीव दगड बघता युद्धात गोफणीत वापरलेले, शत्रूवर फेकलेले हे गोलाकार दगड असू शकतात. रामशेज किल्ला राज्य संरक्षित स्मारक करण्याकडे राज्य पुरातत्त्व विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे. याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे ऐतिहासिक वास्तू अभ्यासक समितीचे मनोज अहिरे यांनी सांगितले.