Nashik Nana Patole : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाबाबत दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील सर्व उमेदवाराबाबत चित्र स्पष्ट होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. तर नाशिक पदवीधर निवडणुकीत जो डाव फडणवीस आणि भाजपने खेळला होता, तो आता जनतेला कळला आहे, दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला जनता त्यांची जागा दाखवेल, असा सूचक इशारा देखील नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. 


नाशिक पदवीधर (Nashik Padvidhar Election) निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाचा आदेश झुगारुन सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याने अखेर दिल्ली हायकमांडकडे तक्रार करण्यात येऊन तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आज माघारीचा दिवस असून नाना पटोले यांनी तीन वाजेपर्यंत सर्व चित्र क्लिअर होईल, असे म्हटले आहे. ते भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, "जो डाव फडणवीस आणि भाजपने खेळला होता, तो आता जनतेला कळला असून विशेष करुन पदवीधर आणि शिक्षक मतदारांना समजून आला आहे. दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला जनता त्यांची जागा दाखवेल." पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी रणनीती आम्ही केली असल्याची स्पष्टोक्ती नाना पटोले यांनी दिली आहे. 


ते पुढे म्हणाले, राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या लढाईतील कुठलीही जागा अदलीबदली होणार नाही. सर्व जागा आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) असे महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत. शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या सर्वच जागांवर आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी भंडाऱ्यात व्यक्त केला. कोणत्याही जागेची अदलाबदल केली जाणार नाही, सर्वच जागांवर महाविकास आघाडी लढणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. 


कुणी काय बोलायचे हा त्यांचा प्रश्न - नाना पटोले


काँग्रेसची उमेदवारी अर्ज दाखल न केल्याप्रकरणी काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडताना कुणी काय मत मांडावे, हा त्यांचा प्रश्न आहे. हायकमांडने ही कारवाई केलेली आहे, मला त्यावर बोलायचे नाही, असे म्हणत तांबे प्रकरणावर नाना पटोले यांनी अधिक बोलणे टाळले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाबाबत दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील सर्व उमेदवारांबाबत चित्र स्पष्ट होईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. 


न्यायव्यवस्थेत सातत्याने हस्तक्षेप होतोय - नाना पटोले


संविधानात न्यायव्यवस्थेवर एक वेगळं स्थान आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नाही. मोदी सरकार असल्यापासून न्यायव्यवस्थेत सातत्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरु असून हे खऱ्या अर्थाने संविधानिक व्यवस्थेसाठी धोका आहे. व्यवस्थेवरही आता जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.