Graduate Constituency Nashik News : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्यजीत तांबेंबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांना चिमटा काढला असून संजय राऊत दिल्लीला राहतात, त्यांना फार गोष्टी माहिती नसतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सत्यजीत तांबेंबाबत अगोदरच एका कार्यक्रमात संकेत दिले होते, तेव्हा कॉंग्रेसला जाग आली नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सकाळी केले होते.


संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याचा आज भंडारा येथे नाना पटोले (Nana Patole) यांनी चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत दिल्लीला राहतात त्यांना फार गोष्टी माहिती नसतात. राऊत जे बोलले, ते कदाचित अनवधानाने बोलले असतील. सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. आम्ही सत्यजीत तांबे यांच्या तोडीस तोड उमेदवार देऊ. परवा, सोमवारी 16 जानेवारीला ते कळेलच असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे. त्यामुळे तांबे यांच्यावर कारवाई करण्याचे कॉंग्रेस हायकमांडकडून स्पष्ट झाल्याचे संकेत देण्यात येत आहे.


राजकारणापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे...


नाना पटोले म्हणाले की, भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह पुण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना विरोध होणे अपेक्षित होते. पण तसे होताना दिसत नाही. याबाबत पटोले म्हणाले, यापेक्षाही महत्वाचे जनतेचे प्रश्‍न आहेत. त्याकडे लक्ष द्यायला हवे. ही सूचना प्रसार माध्यमांसाठीही आहे. कोण कोणाला विरोध करतोय, हा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा नाही, तर लोकांचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे यावेळी नाना पटोले म्हणाले.


उर्फी जावेद वादाबद्दल नाना म्हणाले...


कुणी कसे कपडे घातले, किती कमी घातले, यावर प्रसार माध्यमांवर बातम्यांची भरमार बघायला मिळते. मागे ते जडीबुटीवाले बाबा  म्हणाले होते की, महिला साडीवर चांगली दिसते, सलवारवरही चांगली दिसते अन् बिना कपड्यांचीही चांगली दिसते. अशा पद्धतीने जडीबुटी बाबाने म्हटल्यानंतरही त्याच्यावर कुठलीही कारवाई करायची नाही आणि माध्यमांच्या माध्यमातून वादंग निर्माण करायचा. हे सर्व कशासाठी तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्‍नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हे सर्व प्रकार जाणून घडवून आणले जात आहेत, असे नाना पटोले म्हणाले.


ही बातमी देखील वाचा...


Nagpur : नागपुरात पतंगाच्या मागे धावताना बालकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू