Chhagan Bhujbal : दीन दलितांच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमेव असे शस्त्र आहे असे सांगत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी महात्मा फुले (Mahatma Fule), सावित्रीबाई फुले (Savitribai Fule), छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भावराव पाटील, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्यासह ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांची पूजा करा असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) केले.   


अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समता भूमी फुले वाडा पुणे (Pune) येथे आज राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कवी प्रा.डॉ.यशवंत मनोहर (Yashwant Manohar) यांचा 'समता पुरस्कारा'ने तर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचा 'सत्यशोधक पुरस्कारा'ने गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा प्रश्न असेल तसेच पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा यासाठी खा. शरदचंद्र पवार साहेब यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. अद्यापही फुलेवाडा विस्तारीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तेथील रहिवाश्यांच्या स्थलांतराचा प्रश्न अद्याप बाकी आहे. 


तसेच भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या महिला शाळेच्या ठिकाणी 'सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा' सुरू करून त्या रूपाने राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झालेली आहे. याबाबत लवकरच सर्वांना एकत्रित आणून बैठक घेऊन निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अन्यथा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी 1 जानेवारी पर्यन्त हा प्रश्न मार्गी लागला नाही तर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात आपण सहकुटुंब सहभागी होऊ असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्यावर विविध साहित्य लिहिलं. समाजाला दिशा देण्यासाठी त्यांच हे साहित्य अतिशय महत्वपूर्ण असून एक गांव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी यशस्वीपणे पुढे नेली. तसेच नेहमीच त्यांनी संविधानाचा जागर केला असे त्यांनी यावेळी सांगितले. 
 
तैलचित्रांची मागणी पूर्ण 
अनेक वर्षापासूनचा आपला आग्रह होता की मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश दालनात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे  तैलचित्र लावण्यात यावे. ती मागणी पूर्ण झाली आणि महात्मा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत या दोनही महापुरुषांच्या तैलचित्रांचे मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर अनावरण करण्यात आले. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार त्यांनी मानले. तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविणे असा किंवा नाव सहजासहजी कधीही लागत नाही. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. तो केल्यानंतरही कधी कधी ते काम होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.