Nashik Accident Time : गेल्या काही दिवसांत नाशिक (Nashik) शहरात अपघातांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या अपघाताबद्दल (Accident) धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामीण पोलिसांच्या सर्व्हेनुसार रात्री 8 ते बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. 


एखादी गोष्ट करण्यासाठी अनेकजण वेळ काळ पाहून करतात. मात्र अपघात सुद्धा एका ठराविक वेळेतच होत असल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरासह  ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत. दिवसेंदिवस अपघाती मृत्यूच्या (Accident Death) संख्येतही वाढ हात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि कारण शोधण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) एक सर्वेक्षण केलं. यात दिसून आलं की दुपारी 4 ते संध्याकाळी 8 या वेळात अपघात जास्त होत असून रात्री 8 ते बारा ही वेळ मृत्यूची असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. कामावरून घरी परतणारे, कंपनीतुन घरी परतणारे, चुकीच्या मार्गाने गाडी चालविणारे, दारू पिऊन गाडी चालविणे यामुळं सर्वाधिक अपघात असल्याची कारणे आहेत. 


केंद्रीय मंत्री भारती पवार आणि नाशिक शहराचे खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संसदीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठक पार पडली. यामध्ये नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी या विश्लेषणावर हे सादरीकरण केले. रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी पोलीस करत असलेल्या अनेक उपाययोजनांची माहिती पोलीस आयुक्तांनी समितीला दिली. पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले की ग्रामीण भागात सर्वाधिक अपघात संध्याकाळी 4 ते 8 दरम्यान घडतात. त्यानंतर रात्री 8 ते मध्यरात्री या कालावधीत अपघात झाले. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या अहवालानुसार नाशिक ग्रामीणमध्ये या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत 1,197 रस्ते अपघात झाले. यापैकी 357 अपघात संध्याकाळी 4 ते 8 दरम्यान घडले तर 233 अपघात रात्री 8 ते मध्यरात्री दरम्यान घडले.


दरम्यान अपघातांवर योग्य उपाययोजना करून रस्ते अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्याच्या प्रयत्नात, शहर पोलिसांनी सर्व अपघातांचे विश्लेषण केलेआहे. दिवसा होणाऱ्या अपघातांची पोलिसांनी सहा तासांच्या स्लॉटमध्ये विभागणी केली. यानुसार असे आढळून आले की सर्वाधिक अपघात रात्री 8 ते मध्यरात्री दरम्यान झाले आहेत, त्यानंतर 4 ते 8 च्या स्लॉटमध्ये आहेत. पोलिसांनी सांगितले की, संध्याकाळी 4 ते 8 ही शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीची सर्वाधिक वेळ असते आणि रस्त्यावर जास्त वाहने असतात, तर वास्तविक रॅश ड्रायव्हिंग रात्री 8 नंतर सुरू होते. रात्री 8 नंतर, रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होते, परंतु अपघातांची संख्याही वाढल्याचे दिसून येत आहे. 


अशी आहे अपघात आकडेवारी 
या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर अखेरपर्यंत पोलिसांनी 391 जीवघेण्या आणि प्राणघातक अपघातांची नोंद केली आहे. नाशिक शहर पोलिसांना सहा टाइम स्लॉटपैकी रात्री 8 ते मध्यरात्री या कालावधीत 116 अपघात झाल्याचे आढळून आले. यानंतर सायंकाळी 4 ते 8 दरम्यान 81 अपघात झाले. विश्लेषणात पुढे असे दिसून आले की सकाळी 8 ते दुपारी बारापर्यंत 57 अपघात आणि दुपारी 4 ते 8 दरम्यान 59 अपघात झाले. मध्यरात्री पासून ते पहाटे चार वाजेपर्यंत अपघाताची संख्या सर्वाधिक कमी आहे. या काळात अपघातांची सर्वात कमी संख्या म्हणजे 35 एवढी आहे. या वेळेत रस्ते रिकामे असल्याने अपघातांची संख्या असल्याचे निदर्शनास आले आहे.