Nashik Youth Farmer : शेती म्हटलं कि अनिश्चितता असल्याचा व्यवसाय म्हणून पाहिलं जातं. मात्र अलीकडच्या काळात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळत चालला आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण (Educated Youth) आज शेतीकडे वळतांना दिसत आहेत. शेतीत काहीतरी नवीन करायचं म्हणून नाशिकच्या एका आयटीच्या तरुणाने (IT Sector) बांबूची शेती (Bamboo Farming) उभारून नवा पर्याय उभा केला आहे. 


नाशिकमधील (Nashik) अनेक तरुणांनी आता नोकरीच्या मागे न लागता इतर उद्योग, व्यवसाय, पर्यटन आदी क्षेत्रात उभारी घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातीलच मूळचा त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील तळेगाव येथील असलेला प्रशांत दाते (Prashant Date) याने बांबू शेतीत उतरून प्रगतशील शेतकरी म्हणून नावारुपाला आलेला आहे. सध्या प्रशांत हा लाखलगाव (रामाचे) येथील प्रगतशील युवा शेतकरी म्हणून ओळखला जातो. मात्र तो देखील द्राक्ष, गहू यासारखी पिके घेत असायचा. मात्र द्राक्ष शेतीत मान्सूनच्या लहरीपणामुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीपासून दूर राहण्यासाठी शाश्वत शेतीचा नवा पर्याय म्हणून बांबू पिकाची शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि आजघडीला नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभर त्याची बांबू शेती प्रसिद्ध झाली आहे. आता पुण्यात थेट शंभर एकरवर बांबू लागवड करण्याचा मानस प्रशांतने बोलून दाखविला. 


दरम्यान नाशिक शहरात शिक्षण झालेला, 2012 साली नाशिक येथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता स्वतः शेतीतून काहीतरी नवीन निर्माण करण्याची जिद्द प्रशांतकडे होती. पूर्वी शेतात असणाऱ्या द्राक्ष शेतीला फाटा देऊन हा युवक बांबू शेतीकडे वळाला. द्राक्षाला बांबूचा लागत असायचा, बांबूला अनेक ठिकाणी वापर होत असायचा म्हणूनच बांबू शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र तत्पूर्वी त्याने जिल्ह्यासह इतर भागात जाऊन नेमकी बांबू शेती कशी केली जाते? बांबूचे प्रकार कोणते? कोणत्या हंगामात बांबू शेती केली जाते? हे सर्व प्रश्न त्याच्या मनात घिरट्या घालत होते. यासाठी 2016 मध्ये प्रथम बांबू लागवडीबाबत माहिती घेण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात अमरावती कृषी विद्यापीठ, कृषि विद्यापीठ दापोली या ठिकाणच्या बांबू रोपवाटिकेस भेट देऊन बांबू शेतीबाबत माहिती घेतली. 2017 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबाभळी येथील शेतकऱ्याकडून बांबूच्या माणगा जातीच्या 500 कंद खरेदी करून त्या प्रजातीची लागवड 1 एकर शेतावर केली. जवळपास एक लाख रुपयांचे भांडवल गुंतवून आतापर्यंत सात लाखांचे रोप तयार केल्याचे प्रशांतने सांगितले. 


त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, बांबूगार्डन वडाळी अमरावती, केरला वन संशोधन संस्था पिची, इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट प्रॉडक्टव्हिटी  झारखंड, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जोरहाट आसाम, नागालँड, बांबू संशोधन संस्था, कृषि विद्यापीठ शिमोगा कर्नाटक, जवाहरलाल नेहरु ट्रॉपिकल बॉटनिकल गार्डन व संशोधन संस्था तिरुअनंतपुरम, केरळ ह्या ठिकाणी जाऊन बांबू शेतीबाबतची माहिती घेऊन बांबूच्या विविध 14 प्रजातीचे संवर्धन केले. याशिवाय रोजगाराच्या दृष्टीने स्वतःच्या शेतावर बांबू ऑक्सिजन पार्क ही संकल्पना राबवून हॉटेल व लॉजिंग व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून अर्थार्जनाला नवी संधी निर्माण होईल. सध्या त्यांनी पुणे जिल्ह्यात 100 एकर शेती भाडेतत्त्वावर करार पद्धतीने घेऊन 100 एकर बांबू शेती उभी करण्याचा प्रयत्न सुरू व भविष्यात इथेनॉलसारखा प्रकल्प राबवण्याचा त्यांचा मानस आहे.


पुण्याला शंभर एकर जागेवर बांबूची लागवड


सध्या प्रशांतने आपल्या रोपवाटिकेत 148 पैकी 96 प्रकारच्या बांबूच्या जातीची लागवड केली आहे. जवळपास आठ राज्यातील बांबूंच्या जाती गोळा करून त्या संवर्धन करण्याचे काम प्रशांत करतो आहे. दरम्यान या 96 प्रजातीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2022 मध्ये, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. मागील चार ते पाच वर्षाच्या कालखंडात प्रशांतने दाते बांबू नर्सरी, बांबू नेक्स्ट, दाते बांबू सेटअप अशा तीन योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. आता पुण्याला शंभर एकर जागेवर बांबूची लागवड करण्याचा प्रयत्न असून लवकरच हा टप्पा देखील पूर्ण होणार असल्याचे प्रशांतने सांगितले.