Nashik News : कुटुंबात वडील नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात. काही वेळा असे प्रसंग येतात कि आपसूक डोळ्यातून पाणी येते. अशीच एक घटना नाशिक शहरात घडली आहे. एका बापाने जन्म दिलेल्या आपल्या मुलांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिल्याचा काळीज हेलावणारा प्रसंग नाशिक शहरात प्रत्ययास आला आहे. त्यामुळे साहजिकच आजूबाजूच्या मंडळींच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही.. 


ही डोळे भरून येणारी घटना नाशिक (Nashik) शहरातील अंबड परिसरात घडली आहे. नाशिकचा अंबड परिसर म्हणजे औद्योगिक वसाहतीच्या एक भाग या परिसरात अनेक कंपन्या, छोटे मोठे लघू उद्योग आहेत. त्यामुळे नाशिकसह अनेक जिल्ह्यातील परराज्यातील मजूर वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहे. याच परिसरात राहणारा कृष्णा (Krushna Vishwakarma) हा गॅरेज मध्ये काम करत असताना लाईट गेल्याने त्याने मेणबत्तीच्या उजेडात काम सुरु ठेवले. याच गडबडीत काम सुरु असताना बाजूलाच असलेल्या थिनरने पेट (Fire) घेतला. यात त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 


अंबड (Ambad) परीसरातील इंडोलाईन कंपनीच्या पाठीमागे कृष्णा विश्वकर्मा याचे गॅरेजचे दुकान आहे. रोज सकाळी आठ वाजता येऊन तो गाड्या दुरुस्तीचे काम करत असतो. 1 फेब्रुवारी रोजी त्याची दोन्ही मुलंही याच ठिकाणी होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास गॅरेजमध्ये काम करत असताना अचानक लाईट गेली. लाईट गेल्याने मेणबत्ती पेटवून तिच्या प्रकाशात काम करत करत होता. बाजूलाच दोन्ही मुले बसून वडिलांचं काम बघत होती. अचानक पेटवलेली मेणबत्ती खाली पडली. याचवेळी जवळच असलेल्या थीनरने पेट घेतल्याने कृष्णा गंभीर जखमी झाले. यात उपचार सुरु असताना कृष्णाचा मृत्यू झाला आहे.


वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न... 


अंबड परिसरात कृष्णा यांचे त्यांच्या घराजवळील विश्वकर्मा मोटर्स या गॅरेज मध्ये काम करत असतात. त्या दिवशी लाईट गेल्यामुळे गॅरेजमध्ये मेणबत्ती लावून त्यांचे काम चालू असताना मेणबत्ती खाली पडली. खाली असलेल्या थिनरने पेट घेतला. यात कृष्णा विश्वकर्मा हे मोठ्या प्रमाणात भाजून जखमी झाले होते. प्रसंगी त्यांचे दोघे मुलं देखील यावेळी गॅरेजमध्येच होते. वडिलांच्या कपड्यांनी घेतलेला पेट लक्षात घेऊन त्यांनी वडिलांजवळ जाण्यासाठी हालचाल केली. परंतु बापाचे काळीज ते, इतक्या भीषण प्रसंगी सुद्धा दोघे चिमुकले आपल्याजवळ आले तर त्यांना देखील दुखापत होईल. म्हणून कृष्णा विश्वकर्मा यांनी दोघा मुलांना स्वतःपासून दूर ढकलून देत स्वतःच आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र त्यांना अपयश आले. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले, मात्र आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी वाचविले.