Sharad Pawar : एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnatak Border) चिघळत असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील कर्नाटक सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम देत इशारा दिला आहे. मात्र यावर आक्षेप घेत महंत अनिकेत शास्त्री जोशी (Aniket Shasri Joshi) यांनी शरद पवारांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मागील चाळीस पन्नास वर्षांत हा प्रश्न सोडवला नाही, आता दत्त उपासना करा, असा खोचक सल्ला शास्त्रीनी पवारांना दिला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून यात आणखी भर म्हणजे काल कर्नाटकाच्या (Karnataka) कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रात वातावरण चिघळले असून राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. अशातच काल दुपारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक सरकारवर आगपाखड केली. यावेळी ते म्हणाले कि,  24 तासात हल्ले थांबवा, अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. 


दरम्यान यावर नाशिकचे (Nashik) महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्री पद भूषविलेले आहेत. त्याचबरोबर केंद्रातील अनेक उच्च पदे त्यांनी भूषाविलेले आहेत. महाराष्ट्र्र कर्नाटक प्रश्नी 48 तासांचा अल्टिमेटम दिला, अन सीमा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. मात्र शरद पवार यांची पन्नास वर्षाची कारकीर्द ही राजकारणाशी संबंधित आहे, तर 40-50 वर्षांमध्ये हा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि ते आता 48 तासाचे मुदत देत आहेत, हे कोणत्या तत्वात बसते, असा सवाल शास्त्री यांनी केला आहे. 


ते पुढे म्हणाले, आज दत्त जयंती असून महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त हे गाणगापूरला जात असतात. गाणगापूरला मोठी यात्रा असल्याने लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते. मात्र याचवेळी शरद पवार यांनी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांना जर काही कमी जास्त झालं तर याची सर्व जबाबदारी ही शरद पवार यांची असेल, महाराष्ट्राचा हा वाद चिघळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, त्यांनी आज दत्त उपासना करावी असं त्यांना सांगू इच्छितो, असे आवाहनच महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी केले आहे. 


शरद पवार काय म्हणाले होते?
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद प्रश्नी राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होते, मात्र ती घेतली जात नाही. महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झाले, त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि जे होईल त्याला कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवारांनी दिला होता. पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आज सीमाप्रश्नी आक्रमक भूमिका मांडली.