Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) अवैध मद्य वाहतुकीचा अनोखा फंडा समोर आला आहे. एका पुष्पाने मद्य वाहतुकीसाठी थेट पिकअप वाहनात चोरकप्पा बनवत मद्यतस्करी करत असल्याचे उघडकीस आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कळवण- दिंडोरीरोडवर मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या मद्य तस्कराला अटक केली आहे. 


राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका वाहनातून अवैध मद्य वाहतूक (Illegals Liquor) होत असल्याची माहिती कळवण विभागाचे (Kalwan) निरिक्षकांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे कळवण विभाग आणि दिंडोरी भरारी पथकाचे कळवण वणी दिंडोरी रोडवर संशयित वाहनाचा शोध घेतला असता वणी परिसरात एका पिकअप वाहनाला थांबवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात काही आढळून आले नाही. पथकाला सुरवातीला चुकीची माहिती मिळाल्याचा संशय आला. मात्र पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यानी पिकअपची पाहणी केली असता पिकअपच्या ट्रॉलीचा आकार इतर वाहनांपेक्षा मोठा असल्याचे निदर्शनास आले. पथकाने चालक सुरेश कुमार रामलाल बिश्रोई यास ताब्यात घेत ट्रॉलीची पाहणी केली असता ट्रॉलीच्या खाली चोरकप्पा असल्याचे निदर्शनास आले. पथकाने वरची ट्रॉली ढकली असता खालील ट्रॉलीमध्ये विविध कंपनीचे विदेशी मद्याचे बॉक्स असा 9 लाख 49 हजारांचा मद्यसाठा आढळून आला.


गेल्या अनेक दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यानुसार कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्तरित्या दारुबंदी गुन्हयाकामी सापळा रचुन वाहन तपासणी करतांना एक सफेद रंगाची महिंद्रा कंपनीचे बोलेरो चारचाकी मालवाहतूक पिकअप वाहन हे जात असताना तपासणी कमी थांबविण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनात काही आढळून आले नाही, मात्र तपासणी झाल्यानंतर काहीतरी संशयास्पद वाटल्याने पथकाने चालकास वाहनातील अंतर्गत बाजू दाखविण्यास सांगितली असता त्याने टाळाटाळ केली. सदर वाहनामध्ये अंतर्गत बदल करुन चोरकप्पा बनवुन मद्याची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत होती. वाहनासह परराज्यातील विदेशीमद्यसाठा जप्त केला असून सदर वाहनासोबत असलेल्या इसम नामे सुरेश कुमार रामलाल बिश्नोई यास अटक करण्यात आलेले आहे. 


संपर्क साधण्याचे आवाहन 


सदर कारवाई निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक एम.बी. सोनार, एस. व्ही. देशमुख, जवान सर्वश्री. दिपक आव्हाड, विलास कुबर, एम.सी. सातपुते. पी. एम. वाईकर, व्ही. आर. सानप, गणेश शेवगे, सचिन पोरजे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा तपास एस.के. सह निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक हे करीत आहेत. अवैध तस्करी, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.