नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सलग सुट्ट्या आल्याने नाशिकच्या (Nashik) पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी झाली आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहू लागली आहे. तर आज अधिक मास (Adhik Mas) महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील गोदाकाठावर (Ramkunda) स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. 


विकेंड आणि त्यानंतर आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये (nashik) देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर, सप्तशृंगी गड, ईगतपुरी (Igatpuri) हा परिसर भविकांसह पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. गोदास्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती होते, या श्रद्धेपोटी भाविकांनी रामकुंडावर हजारोंच्या संख्येने हजेरी लावल्याने गोदकाठ दिसेनासा झाला आहे. आज अधिक श्रावण अमावस्या असून उद्या निज श्रावण मासाला सुरुवात होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर देखिल या स्नानाला विशेष महत्व मानले जाते. 


आज 16 ऑगस्ट 2023 रोजी अधिक श्रावण अमावस्याया असून आज अधिक मास समाप्त होईल. अधिक मास संपताच उद्यापासून निज श्रावणाला सुरवात होणार आहे. उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्टपासून निज श्रावण महिन्याला सुरुवात होत असून श्रावणी सोमवार हे चारच असून 21 ऑगस्टला पहिला सोमवार येणार आहे. तब्बल 12 वर्षानंतर अधिक मास आणि श्रावण मास एकत्र आल्याने पवित्र स्नानासाठी गोदाकाठावर भाविकांची मोठ्या संख्येने येथे हजेरी लावली.  आज 16 ऑगस्ट हा अधिकमासाच्या अमावस्येचा  दिवस आहे. ही अमावस्या दर तीन वर्षांनी एकदा येते. अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्नान, दान करण्याला महत्व असल्याचे सांगितले म्हणूनच नाशिकच्या रामकुंडांवर गर्दी पाहायला मिळाली.  


पहाटेपासून गोदाकाठावर गर्दी 


आज अधिकमासाची समाप्ती होऊन उद्यापासून नीज श्रावणाला सुरवात होत आहे. मात्र अधिक मासात भाविकांकडून धार्मिक कार्यासाठी विविध योगांची पर्वणी साधल्याचे पाहायला मिळाले. तर आज अधिक मास समाप्ती आणि विकेंडचे औचित्य साधत गोदाकाठी स्नानादी धार्मिक कार्यांसाठी आज सकाळपासुन हजारो भाविकांची मांदियाळी अवतरली होती. सोमेश्वर ते रामकुंड आणि रामकुंड ते तपोवन या परिघातील गोदाकाठ पहाटेपासूनच गर्दीने खुलला होता. पंचवटीत श्री काळाराम मंदिरासह श्री कपालेश्वर मंदिर आणि इतर प्राचीन मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांच्या संख्येत सध्या वाढ झाली आहे. दरम्यान आजही पावसाची उघडीप असल्याने रामकुंडालगतच्या सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी अनेकांनी रामकुंडात डुबकी घेतली. त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांचे आगमनही पंचवटी परिसरात होत असल्याने अधिक मासासह पुढील श्रावण महिन्यातही रामकुंड परिसरात अशीच वर्दळ राहण्याची चिन्हे आहेत.


 


संबंधित माहिती : 


Nashik Ramkund : गोदास्नानासाठी रामकुंडावर भाविकांची गर्दी