Nashik Airport : काही दिवसांपूर्वी दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेले ओझर विमानतळ (Ojhar Airport) खुले करण्यात आले आहे. या दरम्यान विमानसेवा बंद करण्यात आली होती. यावर उपाय म्हणून आता नाशिक (Nashik) ओझर विमानतळावर नवी धावपट्टी (Runway) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचे काम सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.


गेल्या काही महिन्यापासून ओझर विमानतळ चर्चेत आहे. येथून सुरु असलेल्या स्टार एअर (Star Air), स्पाईस जेट, एअर अलाईन्स  सारखया विमान कंपन्यांनी सेवा कमी केल्या. काहींनी तर काढता पाय घेतला. यामुळे ओझर विमानतळावर सध्या एकच सेवा सुरु ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. अशातच आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने नाशिक विमानतळावर सध्याच्या धावपट्टीच्या समांतर एक नवीन धावपट्टीची योजना आखली आहे. ज्यामुळे ऑपरेशनल क्षमता वाढून भविष्यात शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन विमान वाहतुकीची गरज पूर्ण होईल, या उद्देशाने हा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. 


दरम्यान प्रस्तावित नव्या धावपट्टीसाठी परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावाला एचएएलच्या संचालक मंडळाची मंजुरी आवश्यक आहे. धावपट्टीची लांबी 45 मीटर रुंदीसह 3 किमी असण्याची शक्यता असल्याचं समजते. मागील एकही महिन्यातील विमानसेवेचे वेळापत्रक बघता आगामी काळात जास्तीत जास्त सेवा पुरविण्याचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी एक अत्याधुनिक रनवे व्हिज्युअल रेंज, ऑपरेशनल सहाय्यासाठी मोजमाप करणारी उपकरणे आणि डॉप्लर VHF ओम्नी रेंज देखील स्थापित करण्याची योजना आखली जात आहे. या सर्वांमुळे वैमानिकांना दृश्यमानता कमी असली तरीही सुरक्षितपणे उतरण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) नाशिक विमानतळावरील इमिग्रेशन सुविधा हाताळण्यासाठी संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या HAL ला यापूर्वीच मान्यता दिली आहे. यामुळे ओझर विमानतळावरून भविष्यात कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाण करण्यास सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी  नाशिकहून देशांतर्गत मार्गांवर अधिक विमान कंपन्यांना आकर्षित करण्यासाठीही आगामी काळात अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी नाशिक विमानतळावरील धावपट्टी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे सुमारे दोन आठवडे कामकाजासाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत नाशिकहून विमानसेवा झाली नाही. या पार्श्वभूमीवर दुसरी धावपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक धावपट्टी बंद असली तर दुसऱ्या धावपट्टीवरून विमानसेवा सुरु राहील, असा ओझर एअरपोर्ट प्रशासनाचा उद्देश आहे.