Pune Crime News : वडिलांनी आईस्क्रीम फेकून (Pune Crime) दिल्याचा राग आल्याने मुलींनी आईच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वडगाव शेरी भागात हा प्रकार घडला आहे. वडील सतीश जाधव यांचं डोकं भिंतीवर आदळले. या मारहाणीत वडील गंभीर जखमी झाले. जखमी वडिलांनी पत्नी आणि दोन मुलींविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. शामला जाधव (वय 53 वर्ष), स्नेहल अमोलिक (वय 38 वर्ष) आणि तेजस्वी अमोलिक (वय 34 वर्ष) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे नेहमीप्रमाणे 2 डिसेंबर रोजी घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या मुली बाहेरुन येताना आईस्क्रीम घेऊन आल्या होत्या. "मी 4 चपात्या खाणारा माणूस आहे. या आईस्क्रीमने माझे पोट भरणार नाही" असे जाधव यांनी सांगितले आणि आईस्क्रीम फेकून दिलं. बाहेरुन पैसे देऊन आणलेले आईस्क्रीम फेकून दिल्याचा राग त्या दोन्ही मुलींना आला. या दोन्ही मुलींनी त्यांच्या आईची मदत घेत वडिलांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच त्यांचे डोके भिंतीवर जोरात आदळले. भिंतीवर डोके आदळल्यामुळे जाधव यांच्या मेंदूला जबर मार बसला असून ते गंभीर जखमी झाले. या तिघींवर आता विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन मुली आणि आईवर गुन्हा दाखल
आईस्क्रीमवरुन वाद झाल्यामुळे घरात वाद निर्माण झाला. या वादानंतर मुलींनी आईच्या मदतीने वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली. चपात्या आणि आईस्क्रीमवरुन वाद आणि त्यातून मारहाण झाल्याने वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं. या सगळ्या प्रकरणी तिघींवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यात घरगुती गुन्ह्यामध्ये वाढ
पुण्यात घरगुती गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं सातत्याने समोर येत आहे. क्षुल्लक कारणावरुन वाद निर्माण झाल्याने होणारे गुन्हे जास्त प्रमाणात बघायला मिळतात. दोन दिवसांपूर्वीच मुलगा आणि सुनेने मिळून कट रचून मुलाच्या आईकडून लाखो रुपये आपल्या नावावर करुन घेतले होते. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. लाखो रुपये आपल्या नावावर करुन पैशासाठी स्वत:च्या आईचा विश्वास घात केला होता. त्यांच्या या कृत्यामुळे कुटुंबीय संतापलं होतं. असे अनेक गुन्हे रोज पुण्यात समोर येतात. या घरगुती गुन्ह्यांना आळा घालण्याचं पुणे पोलिसांसमोर आव्हान आहे.