Nashik News : संपूर्ण राज्यभरात गाजलेले राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता इतर परीक्षांत अशाप्रकारे विद्यार्थ्यांना गंडविण्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये असाच प्रकार उघडकीस आला असून फार्मसीच्या (Pharmacy) डिग्रीचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांची फसवणूक (Degree Fraud) केल्याचे समोर आले आहे. 


राज्यासह देशात शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET Scam) घोळ समोर आला. यामध्ये मोठमोठ्या अधिकाऱ्यांसह अनेक दिग्गज यामध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे (Bogus Certificate) आमिष दाखवून लाखो रुपये उकळण्यात आले. हा पारकर संपूर्ण राज्यभरात झाला, अन जवळपास हा घोटाळा कोटींच्या घरात असल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक परीक्षांत अशा फसवणुकीच्या घटना घडत आहेत. नाशिकमध्ये (Nashik) देखील एका विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र देण्यासंदर्भात फसवणूक करण्यात आली आहे. संबंधित युवकांकडून सव्वा लाख रुपये उकळण्यात आले आहे. 


नाशिकच्या येवला तालुक्यात हि घटना घडली आहे. फार्मसीची डिग्री देण्याच्या बहाण्याने कचेरी रोड येथील युवकाची फसवणूक करण्यात आली आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जाकीर अब्दुल रहमान शहा या विद्यार्थ्यांची पाच संशयितांनी संगनमत करून तब्बल एक लाख २५ हजारांची फसवणूक केल्याने शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर शहाला  फार्मसीमध्ये शिक्षण घ्यायचे होते. या दरम्यान त्याने मित्रांच्या माध्यमातून  प्रमाणपत्र काढून देणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आला. 


दरम्यान संबंधित नागरिकांशी संपर्क साधून प्रमाणपत्राविषयी बोलणे झाल्यानंतर व्यवहार करण्यात आला. यावेळी सव्वा लाख रुपयांवर डी फार्मसीची डिग्री देण्याचे कबूल करण्यात आले. त्यानुसार बंगलोर येथील कॉलेजला ऍडमिशन घेतली मात्र प्रवेश फी भरली नाही. या दरम्यान बरेच दिवस झाल्यानंतर डिग्री न मिळाल्यामुळे तसेच मूळ कागदपत्र आणि रक्कमही पार्ट न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शहाच्या लक्षात आले. त्यांनतर त्याने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. शहा यांच्या तक्रारीनुसार पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


या प्रकरणात जाकीर रफिक कुरेशी, गुफरान खान मोहम्मद अली, पाशा मुर्शिद अली, सविता मनोज तिवारी आणि मनोज तिवारी अशी संशयितांची नावे असून पहिल्या तिघांनी शहा यास तुम्हाला घरसबसल्या फार्मसीची डिग्री देतो, असे सांगून सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. जाकीर शहा यांनी येवला पोलिसांत तक्रार दाखल करीत शहा यांच्या तक्रारीनुसार पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.