Nashik Swine Flu : नाशिक (Nashik) शहरात सध्या पावसाची रिपरिप (Rain) सुरु असून अशातच अनेक साथ रोगांनी डोके वर काढले आहे. त्यातच शहरात स्वाईन फ्लूचा (Swine Flu) धोका वाढत असून मागील दोन महिन्यात नाशिकमध्ये जवळपास 79 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
एकीकडे मागील दोन वर्ष कोरोना (Corona Crisis) काळात गेल्याने आता कुठे नागरिक मोकळा श्वास घेत आहेत. मात्र अशातच पुन्हा शहरात साथ रोग पसरू लागले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर अनेक भागात पाणी साचले. अनेक ठिकाणी खड्डे झाल्याने पावसाचे पाणी त्यात साचून राहत असल्याने डासांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डेंग्यू मलेरिया, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू आदी आजारांनी नाशिकरांना ग्रासले आहे. त्यातच स्वाईन फ्ल्यू झपाट्याने हात पाय पसरत आहे. दुसरीकडे कोरोना आणि स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे समान असल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.
दरम्यान स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण वाढल्याने नाशिक आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्ल्यू तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या रुग्णांना त्वरित डॉक्टरांना दाखविणे आणि तपासणी करून घेणे बंधनकारक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. स्वाईन फ्ल्यू हा सामान्य फ्ल्यू सारखा असल्याने याची लक्षणे सामान्य तापासारखीच आहेत. खोकला, सर्दी किंवा स्वाईन फ्ल्यूने संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तुंना हात लावल्यानेही संसर्ग पसरण्याची शक्यता असते.
असा होतो संसर्ग
स्वाईन फ्ल्यूचा व्हायरस नाक, डोळे, तोंडावाटे हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो. लक्षणे दिसू लागल्यानंतर पुढील सात दिवस रुग्ण हा आजार दुसऱ्यांमध्ये पसरविण्याची त्याची क्षमता असते. कमी जास्त प्रमाणात हे विषाणू गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरतात. कारण हा विषाणू नाक घसा आणि फुफ्फुसातील पेशींना संक्रमित करतॊ. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूबाबत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
अशी आहेत लक्षणे
दरम्यान स्वाईन फ्ल्यू झाल्यानंतर रुग्णांना श्वास घेण्यात अडथळा, छातीत खूप जास्त दुखत असेल, स्नायू दुखत असतील, तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. मागील वर्षी कोरोनाचा कहर सुरु असल्याने त्यावेळी स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांना देखील कोरोनाचे रुग्ण म्हणून गणले जात होते. आताही कोरोना आणि स्वाईन फ्ल्यूची लक्षणे सारखी असल्याने स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आहे का? याबाबत लवकर निष्कर्ष येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत सजग राहून आपला परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी योग्य प्रमाणात उकळून प्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे गरजेचे राहील