Nashik Police : नाशिकच्या (Nashik) मध्यवर्ती कारागृहामध्ये (Nashik Central Jail) शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून एका पोलीस सुरक्षारक्षकाला (Police) मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 


नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये काही दिवसांपूर्वी संबंधित कैद्याला आणले होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगात हा कैदी 302 च्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे. संबंधित कैद्यास दुसऱ्या बॅरेक मध्ये जाण्यास बंदी केल्याने त्याने बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षकावर हल्ला केला.प्रभू चरण पाटील असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास कैद्यांची तपासणी सुरु असताना संबंधित कैदी दुसऱ्या बॅरेक जात असल्याचे सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. यावेळी सुरक्षारक्षकाने त्यास हटकले असता त्याने सुरक्षारक्षकास मारहाण करण्यास सुरवात केली. 


त्यानंतर संबंधित कैद्याच्या इतर दहा ते बारा मित्र बंदीवानांनी सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसास दहा ते बारा जणांच्या घोळक्याने दगड आणि लाथा बुक्यांनी मारहाण केल्याने सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच कारागृहातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुरक्षारक्षकास तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सुरक्षारक्षकावर उपचार सुरु असल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. 


दरम्यान या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षारक्षकांसह पोलीस कर्मचारी सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. प्रभू चरण पाटील हा सुरक्षारक्षक कारागृहात असताना त्यांच्यावर हल्ला झाला, म्हणजे कारागृहात असताना देखील कैद्याची मुजोरी किती वाढली आहे? वेळीच इतर कर्मचाऱ्यांनी संशयिताच्या जवळील दगड हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 


येरवडा तुरुंगातही असाच प्रकार
दरम्यान पुण्याच्या येरवडा तुरुंगात 302च्या गुन्ह्यात संशयित म्हणून बंदी होते. मात्र महिन्याभरापूर्वी त्यांना नाशिकच्या कारागृहात शिफ्ट करण्यात आले होते. बुधवारी सकाळच्या सुमारास हि घटना घडली. संबंधित कैद्यांना दुसऱ्या बॅरेक मध्ये जाण्यापासून मज्जाव करण्यात आल्याने त्यांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी कैद्यांनी दगड व लाथा बुक्यांनी सुरक्षारक्षकास मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे संबंधित कैद्याने पुणे येथील कारागृहात सुद्धा अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे.