Nashik News : आपल्या गावातून एखादं माणूस गेलं तरी आपला जीव कासावीस होतो. घरातली कुणीतरी व्यक्ती गेली तर कुटुंबीयांसह आपल्या अश्रूंचा बांध फुटतो. तसंच काही वन्यप्राण्यांच्या बाबतीतही घडताना अनेकदा दिसून येत. असाच काहीसा प्रकार मालेगाव (Malegaon) तालुक्यात घडला आहे. एका वानराच्या निधनानंतर मालेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 


वानराच्या माणुसकीच्या अनेक घटना आजवर ऐकल्या असतील. कुठे वानराने (Monkey Death) अंत्ययात्रेला हजेरी लावली. तर कुण्या माणसाकडून बाटलीने पाणी प्यायले. तर कुठे वानर एखाद्याचा घरात वास्तव्यास राहिले. मात्र एक वानर चक्क एकाच गावात दहा वर्ष राहिले आणि याच गावात त्याचे दुःखद निधन झाल्याची घटना घडली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील टेहरे टोकडे गावात ही घटना घडली आहे. तब्बल दहा वर्षाहून अधिक काळ या गावात वास्तव्य केलेल्या एका वानराच्या निधनानंतर आख्खं गाव शोकसागरात बुडाले आहे. 


दरम्यान वानराच्या निधनानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून टेहरे टोकडे गावात अजून एकाही घरातील चूल पेटलेली नाही. गेल्या दहा वर्षांपासून हे वानर या गावात राहत होते. त्यामुळे गावातील प्रत्येकाशी त्याचा लळा लागलेला होता. मात्र वानराच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावाने हंबरडा फोडला आहे. वानराच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याची गावातून अंत्ययात्रा देखील काढली, शिवाय पारंपारिक पद्धतीने त्याचा अंत्यविधी पार पडला. साधारण! 10 ते 11 वर्षांपूर्वी आईपासून दुरावलेलं हे वानर या गावात आलं. ग्रामस्थांनी त्याला मायेची उब दिली. ग्रामस्थांचं प्रेम पाहून वानर जंगल विसरून टेहरे टोकड्याचा झालं. मात्र अचानक त्याची तब्ब्येत बिघडली. जागचं न हालतं बिचारं पाच तास पडून होतं. त्याची अशी अवस्था पाहून ग्रामस्थांनी तातडीने पशू वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावले आणि तपासणी केल्यानंतर या वानराचं निधन झाल्याचं कळताच शोककळा पसरली. लाडक्या वानराला श्रद्धांजली देण्यासाठी गावात 11 दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे. 


संपूर्ण गाव शोकसागरात .... 


आजही अनेकजण प्राण्याप्रति सहवेदना व्यक्त करतात. तर अनेकजण प्राणी देखील पाळून त्यांना जीव लावत असतात. गावाकडे गाय, बैल, बकरी यांसारखे प्राणी देखील पाळले जातात. लोकांना आपल्या पाळीव प्राण्यांशी खूपच जवळीक असते. एखाद्या माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील आपल्या मालकाच्या भावना कळतात. जर घरातील प्राणी लांब गेलं किंवा जगातून निघून गेलं तर नक्कीच लोकांना दु:ख होतं. काही लोक तर आपल्या आवडत्या प्राण्यांच्या विरहानंतर त्याच्या आठवणीत रडत असल्याचं देखील तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण हे सगळं एखाद्या कुटुंबापुरतं असतं किंवा त्या प्राण्याला सांभाळणाऱ्या मालकाला दु:ख होतं, पण एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एका माकडाच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावाला वाईट वाटलं आहे.