Nashik Crime : गेल्या अनेक वर्षांपासून इगतपुरी (Igatpuri) शहरात खून, मारहाण, लूटमार करून दहशत माजविणाऱ्या डेव्हिड गँगला (David Gang) नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. इगतपुरी परिसरातील दोन खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या डेव्हिड गँगच्या दोन सदस्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यामुळे इगतपुरी शहर, कसारा, कल्याण या परिसरासह स्टेशनवरील गुन्ह्यांना प्रतिबंध लागणार असल्याचे चित्र आहे. 


इगतपुरी (Nashik) शहरातील सर्वसामान्य नागरीक तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील स्टॉलधारक, व्यावसायिकांमध्ये डेव्हीड गॅगच्या सदस्यांमुळे धाक-दडपशाहीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झालेले होते. यातील गुन्हेगारांवर इगतपुरी पोलीस ठाण्यासह (Igatpuri Police), इगतपुरी रेल्वे, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी लुटमार, चोरी, गंभीर दुखापत यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशातच या गॅंगला मोठ्या शिताफीने नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. 


इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत डिसेंबर 2020 मध्ये संजय बबन धामणे यांचा खून करण्यात आला होता. तसेच ऑगस्ट 2022 मध्ये देखील डेव्हिड गँगच्या सदस्यांनी झाकीया मेहमुद शेख या इगतपुरी येथील महीलेवर धारदार चाकूने वार करून तिचा निर्घूण खून केला होता. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर डेव्हिड गँगच्या सदस्यांविरुद्ध मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली होती. त्यात डेव्हिड गँगचे सदस्य जॉन पॅट्रीक मॅनवेल उर्फ छोटा पापा, अनय पॅट्रीक मॅनवेल उर्फ आन्या हे दोघे तेव्हापासून फरार झाले होते. त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सूचनेनुसार शोध घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पथक तयार काण्यात आले होते. मात्र संशयित गुन्हा घडल्यापासून मुंबई, पुणे, औरंगाबाद तसेच कर्नाटक राज्यात वास्तव्य करत होते. 


विक्रोळीत मध्यरात्री टाकला छापा 


पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदारांना यातील गुन्हेगार छोटा पापा व अजय उर्फ आज्या हे मुंबईतील विक्रोळी परिसरात वास्तव्यास असल्याची समजले. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीसांचे पथक मागील 04 दिवसांपासून विक्रोळी परिसरात संशयितांचा शोध घेत होते. अखेर संशयित राहत असल्याचा पत्ता मिळाल्यानंतर पोलीस पथकाने मध्यरात्री छापा टाकून जॉन पॅट्रीक मॅनवेल उर्फ छोटा पापा, अजय पॅट्रीक मॅनवेल उर्फ आज्या या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.