Nashik News : एकीकडे कधी नव्हे ते नाशिक (Nashik) शहरात मरुभूमीतील उंटांचा तांडा दाखल झाला. मात्र एकीकडे चालून चालून थकलेले उंट आणि दुसरीकडे शहरातील उंटासाठी असलेले अपोषक वातावरण यामुळे आतापर्यंत जवळपास सात उंटांचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. याचबरोबर अनेक उंटावर उपचार करण्यात येऊन जवळपास उर्वरित 146 उंटांच्या घरवापसीसाठी नाशिक प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले असून दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. 


मागील आठवड्यात नाशिक (Nashik City) शहरासह जिल्ह्यात अचानक शंभरहून अधिक उंटांचा (camel) तांडा दाखल झाला. त्यानंतर शहरासह जिल्ह्यात चर्चाना उधाण आले. मात्र चर्चाना पूर्ण विराम मिळाल्यानंतर प्रशासनासह पोलिसांनी सावध भूमिका घेत 111 उंटांना नाशिकच्या पांजरापोळ (Panjrapol) येथील गोशाळेत उपचारासाठी ठेवण्यात आले तर नंतरच्या काही उंटांना मालेगाव येथील गोशाळेत ठेवण्यात आले. त्यामुळे जवळपास सहा ते सात दिवसांपासून या उंटावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत, डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येत असून वैद्यकीय चमूकडून उंटांना टॉनिक स्वरूपात औषधांचा डोस दिला जात आहे. जेणेकरून अनेक दिवसांपासून चालत असलेल्या उंटांची अवस्था दयनीय झाली असून पुन्हा आपल्या मरुभूमीत सुस्थितीत पोहचवण्यासाठी त्यांना उपचाराच्या माध्यमातून स्थिर केले जात आहे. 


मात्र नाशिकचे वातावरण उंटांना योग्य नसल्याचे जाणवते आहे. कारण मागील चार ते पाच दिवसात आठ उंटांचा मृत्यू झाला आहे. ज्या पांजरापोळ गोशाळेत उंटांवर उपचार सुरु आहेत, या ठिकाणी गोशाळा असल्याने गोचीड, माशी इतर कीटकांचा सामना उंटांना करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांना देखील उपचार करणे दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर नाशिकचा पारा जरी चाळीशीजवळ असला तरीही यापेक्षा अधिक उन्हाची आवश्यकता नव्हे ते वातावरण उंटांना अपेक्षित असते. ते नाशिक शहरात मिळत नसल्याने उंटांना प्राण गमवावे लागत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच जितक्या लवकरात लवकर शहरात दाखल झालेल्या उंटांना मरुभूमीत पोहचवणे क्रमप्राप्त असल्याचे दिसते. त्यामुळे नाशिक प्रशासन जोमाने तयारी करत असून येत्या एक ते दोन दिवसांत या उंटांची रवानगी मरुभूमीकडे करण्यात येणार आहे. 


आठ उंटांचा मृत्यू 


नाशिक शहरानजीक असलेल्या चुंचाळेमधील पांजरापोळ येथे आश्रयास आलेल्या 111 उंटांपैकी शनिवारपर्यंत सात उंटांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पांजरापोळमध्ये दोन आणि शनिवारी एक असे तीन उंट दगावले तर मालेगावजवळील गोशाळेत एक असे आतापर्यंत या आठवडाभरात एकुण आठ उंट मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे उंटांची घरवापसी महत्वाची ठरत आहे. यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाला या उंटांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी लागणारी मदत देण्याची तयारी धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेने दर्शविली आहे. तसेच उंटांच्या वाहतुक खर्चाची जबाबदारी राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील महावीर कॅमल सेंचुरी या संस्थेने स्वीकारली आहे.