Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात वाळवीने पोखराव तसं लाचखोरीने (Bribe) प्रशासकीय कार्यालय आणि कार्यलयात अधिकारी आणि कर्मचारी व्यवस्थेला पोखरत असल्याचे चित्र आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वारंवार नाशिक शहरासह जिल्ह्यात कारवाई होत असताना लाचखोरी थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच पन्नास हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखच्या (Land Records) जिल्हा अधीक्षकास अटक करण्यात आली होती. आता पुन्हा भूमी अभिलेखामधील लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे.
लिपिकाला 40 हजार रुपयांची लाच घेताना अटक
नाशिकसह जिल्ह्यातील मागील काही लाचखोरीच्या (Bribe) घटनांचा आढावा घेतला असता मागील काही दिवसांत एक नायब तहसीलदार आणि कोतवाल, ग्रामसेवक आदी अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने (ACB) ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीचे जाळे शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पसरल्याचे अधोरेखित झाले आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या जिल्हा अधीक्षकाला तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा नाशिक भूमी अभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपिकास 40 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले आहे. निलेश शंकर कापसे असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती आणि तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिक तालुक्यातील पळसे येथील तक्रारदाराचा जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज होता. मोजणी झाल्यानंतर पोट हिस्स्याच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी कापसे याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकांची मोजणी करुन त्यामध्ये असलेले पोट हिस्स्याच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी वैयक्तिक काम केले म्हणून प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे चाळीस हजार रुपये आणि सदर नकाशावर शासकीय शिक्के तसंच सही आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे 50 हजार याप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांनी फक्त हद्दीच्या खुणा दाखवून देण्यास सांगितल्याने कापसेने प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे 40 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारली.
लाचलुचप्रतिबंधक विभागाकडून वारंवार आवाहन
दरम्यान या सापळ्यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप घुगेसह पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे.