Nashik News : एकीकडे कांदा कवडीमोल भावात विकला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आजच लासलगाव (Lasalgaon) येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा लिलाव बंद पाडला. अशातच सिन्नर (Sinnar) येथिल शेतकरी महिलेच्या उद्विग्न प्रतिक्रियेचा व्हिडिओ समोर आला आहे. शेत गहाण ठेवून कर्ज काढलं, आता भाव नसल्याने मरायची वेळ आल्याचे सांगत सरकारला जाब विचारला आहे. 


नाशिकसह (Nashik) राज्यभरात कांदा दरात होत असलेल्या घसरणीमुळे (Onion Rate) शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांदा दर मिळाल्यानंतर लागवडीचा खर्च सुद्धा निघेनासा झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. अशातच सिन्नर तालुक्यातील एका शेतकरी महिलेची आर्त टाहो एका व्हिडीओच्या माध्यमातून सरकारपुढे मांडला आहे. सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील नीता वाजे या शेतकरी महिलेने व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला जाब विचारत शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. या व्हिडीओत महिला कांद्याच्या शेतातून सरकारवर रोष व्यक्त करताना दिसत आहेत. 


आमच्या पोरींना स्थळ शोधा आणि लग्न करुन द्या; महिलेची उद्विग्न प्रतिक्रिया


सिन्नर येथील वडगावमधील शेतकरी महिला नीता वाजे (Nita Vaje) म्हणतात की, कांद्याला भाव नाही, आम्ही काय करायचं. सरकारने शेतकऱ्यांचा जीव घ्यायचं ठरवलंय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्या,आम्ही वावर गहाण ठेवून कर्ज काढलं, अन् लागवड केली, आता मरायची वेळ आली आहे, पाच मुली लग्नाच्या आहेत, कशी करायची लग्न, आमच्या पोरींना स्थळ शोधा आणि लग्न करुन द्या असा सवाल शेतकरी महिलेने उपस्थित केला आहे. इथून पुढे काय करायचं आता, एका मालाला भाव नाही, कांदे रस्त्यावर, टमाटे, कोबी, फ्लॉवर रस्त्यावर टाकायची वेळ आली आहे. 


नुसते मत देण्यासाठी आम्ही राबायच का? शेतकऱ्यांना दरवर्षी असंच सहन कराव लागतंय. गेल्या पाच वर्षांपासून काहीच उत्पन्न मिळत नाही. सगळे सोन्याचे दागिने मोडून शेती करतोय, पण घरच भागत नाही, कुटुंब कस चालवायचं, एवढे शिक्षण करुन मुलांना नोकऱ्या नाहीत, पुढारी निवडणुकीपुरते मत मागायला येतात, नंतर शेतकऱ्याकडे पाहातही नाहीत. कवडीमोल भावात कांदे, टमाटे विकले जात आहेत, शेतकऱ्यांनी मरायचं का? असा जाब सरकारला या महिला शेतकऱ्याने विचारला आहे. 


नाशिकमध्ये शेतकरी संतप्त 


गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने घसरण होत असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सकाळी कांद्याचे लिलाव रोखण्यात आले.