Nashik Child Trafficking : बिहारमधून (Bihar) महाराष्ट्रात (Maharashtra) लहान मुलांच्या संशयीत (Child Trafficking) तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. बिहारहून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या 30 अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर 29 लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आलं. त्यांच्यासोबत असलेल्या एकूण पाच जणांवर कलम 470 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन होता, अशा संशय रेल्वे पोलिसांना आहे. यामधील काही मुलांची रवानगी नाशिकच्या उंटवाडी परिसरातील बालसुधार गृहात करण्यात आली आहे.
बिहार राज्यातून पूर्णिया (Purniya) जिल्ह्यामधून सांगली (Sangli) येथील मदरशामध्ये तस्करी करुन नेण्याचा डाव भुसावळ (Bhusawal Railway) रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने हाणून पाडला आहे. दानापूर-पुणे एक्स्प्रेस मधून तस्करी करून नेण्यात येणाऱ्या 59 मुलांची भुसावळ ते मनमाड स्थानकादरम्यान 30 मे रोजी सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मुलांच्या तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलांपैकी काही मुलांना जळगाव आणि नाशिक (Nashik) येथील उंटवाडी परिसरातील बालसुधार गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.
दानापूर-पुणे एक्सप्रेस (Danapur Pune Railway) रेल्वे गाडी नंबर 01040 यामध्ये बाल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस भुसावळ यांना मिळाली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भुसावळ येथील एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दाणापूर पुणे ही एक्सप्रेस भुसावळ स्टेशनवर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून 8 ते 15 वयोगटातील 29 मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयीताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
रेल्वेतून बालकांची तस्करी
त्यानंतर भुसावळ ते मनमाड (Manmad) दरम्यान एक्सप्रेस मध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांडून पुन्हा मनमाडपर्यंत प्रवासात रेल्वे गाडीत शोध मोहिम राबविण्यात आली. या रेल्वे गाडीत आणखी 30 मुले आणि 4 संशयित तस्कर मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेत मनमाड रेल्वे स्टेशनवर उतरविण्यात आले. भुसावळ येथे मिळून आलेल्या 29 मुलांना जळगाव येथील बाल निरीक्षण गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले असून मनमाड येथील 30 मुलांना देखील नाशिकच्या बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.
रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
रेल्वे सुरक्षा बलाच्या केलेल्या चौकशीत सदर मुलांची मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सदर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सदरहू पाच संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.