CM Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakaray) यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्यासाठी बाहेर पडलो. शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांनी एकत्रितरित्या निवडणूक लढवली, मात्र शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेस यांच्यासोबत महाआघाडी केल्याने आम्ही उठाव केला आणि स्वतंत्र गट घेऊन आम्ही बाहेर पडलो, आमची भूमिका राज्याचा विकास अन सर्वसामान्यांना न्याय देण्याची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मालेगाव (Malegoan) दौऱ्यावर होते. त्यानंतर ते येवला (Yeola) येथे स्वागत समारंभात बोलत होते. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंनी आपण स्वतंत्र गट घेऊन बाहेर पडलो याची कारणे सांगितली. यावेळी त्याचे स्वागत येथील जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करत शाही पगडी घालून शिंदे शाहीचा मान वाढविला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही मिनिटेच पण जोरदार भाषण ठोकले. ते म्हणाले की, आम्ही स्वार्थासाठी बाहेर पडलो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनमानसात पोहचविण्यासाठी बाहेर पडलो. पंतप्रधान मोदी आमच्या सोबत असल्यामुळे आमचा परिवार वाढत चालला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने आम्ही सत्तेवर आल्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णय घेत धडाडीने काम सुरू केले आहे.
ये पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान, अनेक ठिकाणी पाणी योजना, विजेचे प्रश्न सोडविले. पेट्रोल डिझेलचे दर कमी केले असून टप्प्याटप्प्याने निर्णय घेऊन राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रात कुठे बसवायचा असा प्रश्न करीत राजापूर येथे शिवाजी महाराज पुतळा बसविल्यावर गुन्हे दाखल असलेल्या तरुणांवर गुन्हे मागे घेण्याचे आदेश आदेश देउ, पालखेड मांजरपाडा कोणत्याही प्रकल्पाला जमेल तसे सहकार्य करू असा शब्द जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
येवला भुजबळांचा बालेकिल्ला!
मालेगाव सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे येवल्यातील विंचूर चौफुलीवर स्वागत करण्यात आले. यावेळी भाषणात बोलले की, हा मतदार संघ सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांचा आहे, मात्र याच दरम्यान उपस्थित माणिकराव शिंदे यांनी हा भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सारवासारव केली.
आम्हाला हजारो लोकांचा पाठींबा!
बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चाललो आहोत. त्यांचे हिंदुत्ववादी विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. आमची भूमिका राज्यातील तमाम शिवसैनिकांना भावल्यामुळेच राज्यात हजारो लोक आम्हाला पाठिंबा दर्शवत आहेत. आमची भूमिका राज्याला विकासाकडे घेऊन जाण्याची व सर्वसामान्यांना न्याय देण्याची आहे. येथील रखडलेले प्रश्न नक्कीच सोडवले जातील, आपण रखडलेल्या कामांचे त्यासाठी शिष्टमंडळ घेऊन समक्ष भेटा, त्या समस्याही सोडवू असे, आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.