Nashik Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात मंत्री एकही शिल्लक नाही, सगळे अयोध्येला (Ayodhya) गेले. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या. मात्र सरकारच शेतकऱ्यांकडे लक्षच नाही. त्यामुळे सत्तेवर योग्य माणूस आपण बसवला नाही तर अशा पद्धतीने सरकार जनतेला वेठीस धरले जातात, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. 


आमदार सरोज आहिरे (Saroj ahire) यांच्या मतदार संघातील (Nashik) देवरगाव येथे आदिवासी आश्रम शाळा (Devargaon Ashram School) इमारत व मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आदिवासी मुलामुलींसाठी शिक्षणासाठी आश्रम शाळा वसतीगृह अतिशय महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी दर्जेदार शिक्षण हे अतिशय महत्वाचे असून आदिवासींचे शिक्षणाचे प्रश्न सोडविले तर हा समाज व्यवस्थेत पुढे येऊ शकतो त्यामुळे आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बांधवांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. या आदिवासी समाजाच्या विकासाठी 9 टक्के रक्कम खर्च करण्याची जबाबदारी पवार यांच्यामुळे आदिवासी मंत्र्यांना मिळाली. त्यातून ते आदिवासी बांधवांचे प्रश्न सहज सोडवू शकतात. मात्र काही मंत्र्यांच्या नियोजनाच्या अभावी आजही आदिवासी बांधव वंचित राहत आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विकासासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असून सरकार आणि समाजाने आदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा असे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी पवार साहेबांनी राज्याच्या बजेटमध्ये 9 टक्के निधीची तरतूद कायम केली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. आजही काही प्रमाणात आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे भुजबळ म्हणाले. 


देव देव करा शेतकऱ्याकडेही लक्ष द्या... 


राज्यात अवकाळी नुकसान, कांद्याचे अनुदान याची मदत अजून मिळत नाही. अनुदानातील अटी अधिक असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यासाठी शासनाकडे मागणी आहे. जनतेचे प्रश्न प्रलंबित असताना अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील मंत्री परत आले की त्यांना पुन्हा एकदा सांगू अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात मंत्री एकही शिल्लक नाही, सगळे अयोध्येला गेले. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या. मात्र सरकारच शेतकऱ्यांकडे लक्षच नाही. त्यामुळे सत्तेवर योग्य माणूस आपण बसवला नाही तर अशा पद्धतीने सरकार जनतेला वेठीस धरले जातात.


पवार यांचे हात अधिक बळकट करा... 


सद्यस्थितीत जाती पातीच राजकारण सुरु आहे. अनेक मिरवणुकांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुटुंबाचं पोट भरू शकत नाही. त्यामुळे योग्य तो निर्णय जनतेने घ्यावा. बाजार समित्यांच्या निवडणुकीत आपला विजय झालाच पाहिजे. योग्य निर्णय घेऊन पवार यांचे हात अधिक बळकट करा असे आवाहन त्यांनी केले. शरद पवार यांच्या विचारांचे पॅनल तयार करा, आपला विजय झाला पाहिजे, अनेक ठिकाणी महाविकास आघाडी ला विजय प्राप्त होतो आहे, त्यामुळे एकजुटीने कामाला लागा, योग्य निर्णय घ्या, शरद पवार यांचे हात बळकट करा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.